ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मारोती थोरवे यांच्या कामकाजाबाबत तक्रारी; चौकशीचे निर्देश

तक्रारींची पडताळणी करून मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा : येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील मारोती उत्तमराव थोरवे यांच्या कामकाजासंदर्भात प्राप्त तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश भूमिअभिलेख विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत. तक्रारीतील सर्व मुद्द्यांची सखोल पडताळणी करून नियमानुसार कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

आडगाव राजा येथील श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव गड-किल्ले ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकृष्ण भगवंतराव राजेजाधव यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात तक्रार अर्ज सादर केला होता. भूमिअभिलेखविषयक कामांमध्ये विलंब होत असल्याचे, नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे तसेच कार्यालयीन कामकाजात मनमानी होत असल्याचे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. या तक्रारींची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारीची दखल घेत उपसंचालक भूमिअभिलेख, अमरावती प्रदेश कार्यालयाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, बुलढाणा यांना पत्र पाठविले. तक्रार अर्जातील सर्व मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमावे, नियमानुसार कार्यवाही करावी, तक्रारदाराला योग्य उत्तर द्यावे आणि चौकशीचा मुद्देनिहाय अहवाल सादर करावा, असे या पत्रात नमूद आहे.

त्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, बुलढाणा कार्यालयाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी उपअधीक्षक भूमिअभिलेख, सिंदखेडराजा यांच्याकडे पाठविला. तक्रारीतील मुद्द्यांची चौकशी करून तक्रारदाराला कळवावे तसेच त्याबाबतचा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

या प्रकरणात मारोती थोरवे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. उपलब्ध शासकीय पत्रांमध्ये तक्रारीतील आरोप सिद्ध झाल्याचे नमूद नाही. त्यामुळे चौकशीअंती समोर येणाऱ्या निष्कर्षांनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये