नवरात्रोत्सव २०२६ : वर्धा पोलीस दल सज्ज! नवरात्रोत्सवासाठी वर्धा पोलिसांची व्यापक पूर्वतयारी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आगामी नवरात्रोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नवरात्रोत्सव उत्साहपूर्ण तसेच शांततामय वातावरणात पार पडावा आणि ध्वनी प्रदूषण व लेझर लाईटच्या वापरावर प्रभावी नियंत्रण राहावे, यासाठी वर्धा पोलीस दलाने व्यापक व बहुआयामी पूर्वतयारी केली आहे.
नवरात्रोत्सव हा सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. या उत्सवाला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा जपणारे स्वरूप मिळावे, यासाठी वर्धा पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
ध्वनी प्रदूषणावर पोलिसांची कडक नजर :
-नवरात्रोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३६ तसेच कलम ३८(१) अन्वये पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी ध्वनी प्रदूषण प्रतिबंधाच्या अनुषंगाने कलम १६३ BNSS अन्वये आदेश जारी केले आहेत. या आदेशांची व्यापक प्रसिद्धी करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, म्प्लिफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करताना मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय आणि शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता क्षेत्रांमध्ये Noise Level Meter द्वारे ध्वनी पातळीचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत ध्वनी पातळीतील वाढ किंवा नियमांचे उल्लंघन यावर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, उत्सवाचा आनंद इतर नागरिकांच्या शांततेच्या व आरोग्याच्या अधिकारांवर गदा आणणारा ठरणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
धोकादायक लेझर लाईटवर प्रतिबंध :-
नवरात्रोत्सवातील मिरवणुका व इतर कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या Laser Light मुळे नागरिक, वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच विशेषतः वाहनचालकांच्या दृष्टीस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कलम १६३ BNSS अन्वये वर्धा जिल्ह्यात लेझर लाईटच्या वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बैठकांमधून समन्वयाला प्राधान्य :-
नवरात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी आयोजक मंडळे, ध्वनीक्षेपक चालक-मालक, शांतता समिती आणि नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर वर्धा पोलिसांनी विशेष भर दिला आहे. ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, अॅम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे मालक, आयोजक मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समितीच्या सदस्यांच्या विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये उत्सवादरम्यान पाळावयाचे नियम, ध्वनी मर्यादा, मिरवणुकीतील शिस्त, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, आयोजक, डीजे चालक-मालक किंवा जबाबदार व्यक्तीविरुद्ध लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबतही विविध बैठकांद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीमः रूट मार्चद्वारे पोलिसांची सज्जता :-
नवरात्रोत्सवादरम्यान कोणत्याही अनुचित परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना संभाव्य परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे, जमाव नियंत्रण, संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत प्रत्यक्ष सराव करून देण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील विविध संवेदनशील व महत्त्वाच्या भागांमध्ये रूट मार्च घेण्यात आले असून, पोलीस दलाची सज्जता आणि प्रभावी उपस्थिती नागरिकांना जाणवून देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला. २४x७ सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कार्यान्वित :-
नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे २४x७ Social Media Monitoring Cell कार्यान्वित राहणार आहे. सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ, संदेश अथवा अन्य स्वरूपातील मजकूर प्रसारित करून सामाजिक सलोखा व कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे प्रसारित करू नये. संशयास्पद किंवा आक्षेपार्ह माहिती आढळल्यास ती स्वतःहून व्हायरल न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केले आहे.
नवरात्रोत्सवासाठी चोख सुरक्षा व्यवस्था; २,००० पेक्षा अधिक पोलीस मनुष्यबळ तैनात
नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वर्धा पोलीस दलाकडून चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. बंदोबस्त कालावधीत पुढीलप्रमाणे पोलीस मनुष्यबळ तैनात राहणार आहे. ११४ पोलीस अधिकारी १२०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथके, १ जलद प्रतिसाद पथक, १००० होमगार्ड, २ एस.आर.पी.एफ. तुकड्या, जिल्ह्यातील दुर्गा मंडळे, मिरवणूक मार्ग, संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या चौकांवर आवश्यकतेनुसार अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला तात्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी वर्धा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराविरुद्ध तत्काळ व कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई:-
वर्धा पोलीस दलाकडून दुर्गा मंडळे व नागरिकांना उत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन, निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन, प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर, सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणारी कृत्ये, सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कृती किंवा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, आयोजक, डीजे चालक-मालक किंवा जबाबदार व्यक्तीविरुद्ध लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
नवदुर्गा सन्मान-२०२६पुरस्कार स्पर्धेचे आयोजन :-
या वर्षी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी “नवदुर्गा सन्मान-२०२६” या पुरस्कार स्पर्धेचे पोलीस ठाणे स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील विषयांवर उत्कृष्ट करणाऱ्या दुर्गा मंडळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
दामिनी पथक व महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती.
नारीशक्ती व सामाजिक प्रबोधन.
कन्या व महिला गौरव.
महिला नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग.
महिलांचे आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता व शासनाच्या योजनांची माहिती.
मुलींचे शिक्षण, करिअर व नेतृत्व विकास.
सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रम.
पर्यावरण संवर्धन व स्वच्छता.
सुरक्षित उत्सव व्यवस्थापन आणि पोलीस समन्वय.
नाविन्यपूर्ण संकल्पना व एकूण आयोजन.
“Save Water” संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम.
वरील विषयांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दुर्गा मंडळांना पोलीस ठाणे स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिली. पोलीस प्रशासन आणि दुर्गा मंडळांच्या
संयुक्त जबाबदारीतून सुरक्षित नवरात्रर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गा मंडळांनी “Save Water” ही संकल्पना राबवून पाणी बचत व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केले आहे.
श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आवाहन :-
नवरात्रोत्सव हा श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात, मात्र शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन करून साजरा करावा. दुर्गा मंडळांनी ध्वनी मर्यादा, मिरवणुकीचे नियम, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, वाहतूक व्यवस्था तसेच प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर करू नये. सोशल मीडियावरील अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे प्रसारित करू नका. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना द्या. वर्धा पोलीस दल आपल्या सेवेसाठी २४ तास सज्ज आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि शांतता, सुरक्षितता व सामाजिक सलोखा जपत नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.



