अवैद्य रेतीतस्करीत काँग्रेस नेत्याच्या दोन सुपुत्रांवर पोलिसांचा “पंजा”
चालक_मालकांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; दोन ट्रॅक्टर व ट्रॉली आणि जेसीबी असा ३०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ राजकारणातील वडिलांचे वजन आणि सर्वांसोबत असलेल्या मधुर संबंधाचा फायदा घेत रात्री अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या स्थानिक राजकीय नेत्याच्या दोन सुपुत्रांसह सहा जणांविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून घटनास्थळावरून दोन ट्रॅक्टर व ट्रॉली आणि एक जेसीबी असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैद्य पद्धतीने रेती तस्करी करणाऱ्यांवर गोंडपिपरी पोलिसांचा जोरदार “पंजा” बसल्याने तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, १५ जुलै च्या रात्री पहाटे साडेतीन वाजता मौजा कुलथा ते तारसा जाणाऱ्या रोडलगत असलेल्या संतोष देवाडे यांचे शेतजवळ असलेल्या खुल्या जागेत रेतीचा अवैधरित्या साठा करून ठेवला असून, त्या ठिकाणावरून जेसीबीच्या सहाय्याने दोन ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या रेती भरून वाहतूक करीत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारकडून पोलिसांना मिळाली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आणि पंचासह जाऊन धाड टाकली असता, त्या ठिकाणी विना नंबरची लाल रंगाची महिंद्रा सरपंच ४७५ डीआय ट्रॅक्टर व ट्रॉली, दुसरे विना नंबरचे ट्रॅक्टर लाल रंगाची मेस्सी फर्ग्युसन ९५०० व ट्रॉली क्रमांक एमएच ३४ एल ९९२७ असे एकूण दोन ट्रॅक्टर व रेती भरलेले दोन ट्रॉली जप्त करण्यात आले. यासोबतच सदर रेती भरण्याकरिता वापरण्यात आलेले विना नंबरचे जेसीबी 3DX प्लस जप्त करण्यात आले. ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत अंदाजे दहा लाख रुपये, जेसीबी किंमत अंदाजे वीस लाख रुपये आणि रेतीची किंमत अंदाजे वीस हजार रुपये असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आशिक नरेश मडावी (१९ वर्षे) राह. व्यंकटपूर, रितेश देवेंद्र बट्टे (३० वर्षे) राह. गोंडपिपरी, प्रज्वल विश्वनाथ कोहपरे (१९ वर्षे) राह. वढोली, हेमंत बंडू निखाडे (२८ वर्षे) राह. फुरडीहेटि, सचिन सुरेश चापले (२२ वर्षे) राह. कवठी ( तेलंगणा) लोकेश देवेंद्र बट्टे (२० वर्षे) राह. गोंडपिपरी अशा चालक_मालक असलेल्या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भा. न्या. सं. कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची ही धडाकेबाज आणि यशस्वी कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वसंत कोसमशिले, चालक सहाय्यक फौजदार पुणेश्वर कुलमेथे, पोलीस अंमलदार प्रशांत नैताम, तिरुपती गोडसेलवार, अतुल तोडासे, सुनील गव्हारे यांनी केली आहे.



