ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिवरा ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

हिवरा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंधरावा वित्त आणि सामान्य फंड व इतर विकासकामांवरील खर्चासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र, संबंधित विषयांवर समाधानकारक उत्तरे न देता ग्रामसभा मनमानी पद्धतीने तहकूब करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

 ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकार कायदा (RTI) अंतर्गत मागविण्यात आलेली माहिती कायदेशीर मुदतीत देण्यात आली नाही. प्रथम अपीलनंतर सक्षम अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे आदेश दिले असतानाही जनमाहिती अधिकाऱ्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करून माहिती न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही केराची टोपली दाखवत ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुलगमकर व त्यांचे सहकारी यांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन नोंदविण्यात आलेला खर्च आणि प्रत्यक्ष गावात झालेली विकासकामे यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुलगमकर, प्रशासकीय समिती सदस्य जितेंद्र गोहने, माजी उपसरपंच प्रकाश हिवरकर, शंकर येलमुले, भिवसन चहारे, रत्नज्योत कांबळे तसेच इतर ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सविस्तर चौकशीची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.

तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी २० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून कारवाई अहवालाची प्रत देण्यात येईल, असे तक्रारदारांना सांगितले आहे. मात्र, निर्धारित मुदतीत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर हिवरा गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते साखळी उपोषणासह तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये