ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुक्यात ३४९ च्या रिचार्जची सक्ती?

जिओ सेल्स व्यवस्थापकावर एजंटांचा गंभीर आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती  तालुक्यातील घोडपेठ व परिसरात जिओ कंपनीच्या रिचार्ज एजंटांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कमीशन बेसिसवर काम करणाऱ्या एजंटांना संबंधित सेल्स व्यवस्थापकाने “ग्राहकांना फक्त ३४९ रुपयांचाच रिचार्ज करा, कमी किंमतीचे रिचार्ज करू नका” असा तोंडी आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घोडपेठ येथील एका एजंटने सांगितले की, अनेक ग्रामीण ग्राहक कमी किमतीच्या रिचार्जची मागणी करतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता तेवढाच प्लॅन त्यांना परवडतो. मात्र व्यवस्थापकाकडून ३४९ रुपयांचाच प्लॅन करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. कमी किंमतीचे प्लॅन जिओ कंपनीच्या ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिक कमी दराच्या रिचार्ज ची मागणी करतात. असे एजंटचे म्हणणे आहे.

याशिवाय, “३४९ चे रिचार्ज न केल्यास तुमचे काम बंद करू” अशी धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोपही एजंटांनी केला आहे. ग्राहकांकडे पुरेसे पैसे नसल्यास त्यांना परत पाठवा, असे व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सदर सेल्स व्यवस्थापक यांच्या यापूर्वी गडचांदूर येथे कार्यरत असताना अशाच प्रकारच्या तक्रारी झाल्या होत्या, अशी चर्चा स्थानिक एजंटांमध्ये सुरू आहे.

भद्रावती तालुक्यातील अनेक एजंट या प्रकारामुळे आर्थिक व मानसिक तणावाखाली काम करत आहेत. ग्राहकांना परवडणारे पर्याय नाकारले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी एजंट व नागरिकांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये