ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दौऱ्यात सहभागी विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ इस्रो आणि नासामध्ये दिसतील – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

नागपुरातील हॉटेल प्राईडमध्ये बाल वैज्ञानिकांचा गौरव ; पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याकडून गौरव व स्नेह भोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा :_ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून इस्रोची सफर करून परतलेल्या ४४ बाल वैज्ञानिकांचा नागपूर येथील हॉटेल प्राईडमध्ये शाही सत्कार करण्यात आला. आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक आहेत. भविष्यात हेच विद्यार्थी इस्रो आणि नासामध्ये संशोधक म्हणून दिसतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.

या सत्कार सोहळा कार्यक्रमास तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, आयआयएम (IIM) नागपूरचे डॉ.शिवाजी धावड, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्रा, राज्य विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.राजकुमार अवसरे आणि डायट वर्धाचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे तसेच बालवैज्ञानिक प्रामुख्याने उपस्थित होते.

*विज्ञानाचा वेध घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान असते. विद्यार्थ्यांनी केवळ ते वाचून न थांबता त्यामागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. ही जिज्ञासाच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

*जिल्हा नियोजन निधीचा विनियोग*

वर्ध्याच्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञानाची जागतिक ओळख व्हावी, यासाठी या विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून या ऐतिहासिक दौऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यात आले. विमानाने प्रवास करत बंगलोरमधील ‘इस्रो’ आणि कुप्पममधील ‘अगस्त्या फाउंडेशन’ येथे या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि उपग्रहांचे तंत्रज्ञान जवळून अनुभवले.

*उत्साही स्वागत आणि भोजनाचा आनंद*

विमानतळावरून थेट हॉटेल प्राईड येथे आलेल्या विद्यार्थ्यांचे रेड कार्पेटवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या स्नेहभोजनात मान्यवर आणि विद्यार्थी एकाच टेबलावर बसून चर्चा करतांना दिसले. विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभव कथनातून ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये