ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवजयंती निमित्त चंद्रपुरात भव्य स्केटिंग रॅली

चिमुकल्या शिवभक्तांचा उत्साह

चांदा ब्लास्ट

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साह, शिस्त आणि देशभक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. श्री शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर आणि SSKM Roller Skating Academy यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भव्य शिवजयंती स्केटिंग रॅली – २०२६” ने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लहानग्यांपासून तरुणांपर्यंत शेकडो स्केटर्सनी हातात भगवे ध्वज घेऊन “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर आसमंत दुमदुमला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले समाजसेवक अक्षय शेंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, शिस्तबद्ध नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. स्केटिंगसारख्या क्रीडा प्रकारातून मुलांमध्ये जिद्द, आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे सांगत त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजता रॅलीची सुरुवात महात्मा गांधी पुतळा, जटपुरा गेट येथून झाली. गिरनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथे रॅलीचा समारोप झाला. मार्गक्रमणादरम्यान महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पूजन करण्यात आले तसेच आकाशात ऑरेंज बलून सोडून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना अर्पण करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा प्रभावती एकुरके, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, नगरसेवक जितेश कुळमेथे, समाजसेवक अक्षय शेंडे, सागर हरने, प्रतिक वनकर, दीपक वाभिटकर तसेच माता महाकाली पॉलिटेक्निक, वरोरा यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

रॅलीत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणातून देशभक्ती, अनुशासन आणि क्रीडावृत्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला. शिस्तबद्ध आयोजन, सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि उत्साही सहभाग यामुळे नागरिकांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले.

 मुख्य आकर्षण

रॅलीतील विशेष आकर्षण ठरलेली चिमुकल्यांची वेशभूषा सर्वांच्या मनाचा ठाव घेऊन गेली.

बाळ शिवबा – अधीर जुन्नावार, जिजामाता – वैभवी मसराम, शौर्य पिंपळशेंडे, माही मोडकवार, क्रियांश कडसर, आरुष पोटे या चिमुकल्या शिवभक्तांनी साकारलेल्या ऐतिहासिक वेशभूषेमुळे वातावरणात शिवकालीन तेज आणि अभिमानाची भावना दाटून आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल सर, सुमित सर, राजू सर, क्रीडा प्रशिक्षक दिनेश सर तसेच सर्व पालकांनी परिश्रम घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली. नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद खेळाडूंना अधिक प्रेरणा देणारा ठरला.

सचिव : विनोद निखाडे

आयोजक : श्री शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर

शिस्त, देशभक्ती आणि क्रीडावृत्तीचा संगम घडवणारी ही शिवजयंती स्केटिंग रॅली चंद्रपूरकरांच्या स्मरणात कायमची कोरली गेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये