ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा

चंद्रपूरात उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, जि.प. शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 19) सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, महानगर पालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे (माध्य.) अश्विनी सोनवणे (प्राथ.), जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते

 यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला प्रारंभ होताच विद्यार्थ्यांनी शिवगर्जना व जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित वेशभूषा, पोवाडे, आकर्षक झाँकी व घोषणांच्या माध्यमातून राष्ट्राभिमान जागविला. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक – महात्मा गांधी चौक – आझाद बगीचा – गिरणार चौक मार्गे होत शेवटी मनपा पार्किंग येथे समारोप करण्यात आला.

रॅलीतील उत्कृष्ट सादरीकरणासाठी आयुक्त महानगरपालिका यांच्या हस्ते तीन सामूहिक व तीन वैयक्तिक पारितोषिके (ट्रॉफी व पेन सेट) प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळेला देण्यात आला. या शाळेतील विद्यार्थी निरव चहारे यांनी शिवचरित्रावर प्रभावी पोवाडा सादर केला. द्वितीय क्रमांक लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर तर तृतीय क्रमांक पीएमश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळा, बाबुपेठ, चंद्रपूर यांनी मिळविला.

या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, सामाजिक व महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक, खेलो इंडिया खेळाडू, एन.एस.एस., एन.सी.सी., क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी व शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. एकूण 22 शाळा व महाविद्यालयांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी संदीप उईके, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे तसेच प्रशासन अधिकारी सुनील आत्राम, मेरा युवा भारतचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, क्रीडा व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये