ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आष्टी (का.) येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे गाव विकासाचा मूलमंत्र : पुरुषोत्तम स्वान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित विवेकानंद ज्ञानपीठ काॅन्व्हेंट वरोरा, द्वारा संचालित विवेकानंद महाविद्यालय, भद्रावतीचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर मु. आष्टी (का.) पो. बेलगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथे दि. 06 फेब्रुवारी, 2026 ते 12 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.‌ या शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम शनिवार दि. 7 फेब्रुवारी, 2026 ला सायंकाळी 04.00 वाजता आयोजित करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोराचे अध्यक्ष, मा. पुरुषोत्तमजी स्वान सर होते. तर उद्घाटन म्हणून गुरुदेव सेवा मंडळ आष्टीचे अध्यक्ष, महादेवराव बदकी तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत आष्टीचे सरपंच श्री. गोविंद कुळमेथे, पोलीस पाटील, श्री. रुपेश उईके, सौ. वर्षाताई ढाकणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, श्री. चंदूजी शेडामे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, श्री महादेव कुंमरे, विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकास समितीचे अध्यक्ष, श्री. संजय काकडे, माजी सरपंच, भगवान काकडे, चंद्रपूर येथील हार्टफुलनेसचे मार्गदर्शक, डॉ. रमेश पारेलवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रा. जयवंत काकडे आदी उपस्थित होते.

          सदर शिबिराचे उद्घाटनप्रसंगी विचार मांडताना श्री महादेवरावजी बदकी म्हणाले, राष्ट्रसंतंना ग्रामोन्नती अभिप्रेत होती. राष्ट्रीय सेवा योजनेचाही उद्देश सेवा हाच आहे. मी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे हे ब्रीद वाक्य आहे. म्हणून या शिबिराच्या माध्यमातून तुमच्याकडून आमच्या गावाची सेवा होईल, आम्हाला बोधप्रद काही शिकायला मिळेल; तर आमचे अनुभव तुम्हाला शिबीर यशस्वी करण्यासाठी सहाय्यक होईल. म्हणूनच राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला ग्रामोन्नतीचा मंत्र तुम्हा-आम्हाला अनुसरता येईल व आपले जीवन आणि गावही उन्नत करून घेता येईल.

       आष्टी येथील सरपंच श्री गोविंद कुळमेथे विचार मांडताना म्हणाले, विवेकानंद महाविद्यालय, भद्रावतीचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर आमच्या गावाला होत आहे ही आमच्यासाठी एक संधी आहे. तुमचे मी गावाचा सरपंच म्हणून स्वागत करतो व आपल्याला सर्व प्रकारची मदत गावाच्या वतीने करण्याचे आश्वासन देतो. आपले विचार व कृतीकार्याचा आम्हाला निश्चितच लाभ होईल अशी आशा बाळगतो.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पुरुषोत्तमजी स्वान अध्यक्षीय विचार मांडताना म्हणाले, आमचे शिबिरार्थी म्हणजे आमची मुले आहेत. जी आपल्या गावात सात दिवस मुक्कामी राहणार आहे. त्यांच्या तरुणाईचा, शक्ती युक्तीचा जेवढा लाभ गाव विकासासाठी करता येईल तेवढा करून घ्यावा. ही मुले विचार देईल, कार्य करेल व शिबिर संपले की निघून जाईल, परंतु गाव म्हणून तुम्ही राहणार आहात. राष्ट्रसंत म्हणतात ‘मतभेद को भुलाना है’, ‘भेद लयास जाओ’ हे बोधवाक्य मनी मानसी ठसवा व आपल्या हातानेच आपल्या गावाची उन्नती करून घ्या. ‘गाव करी ते राव नाही करी’ ही मन आहे. म्हणूनच गाव म्हणून एक व्हा व आपल्या गावाचा विकास साधून घ्या.

        याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. जयवंत काकडे यांनी केले, संचालन डॉ. गजानन खामकर यांनी तर आभार प्रा संगीता बांबोडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिबिरार्थी स्वयंसेवकांबरोबरच महाविद्यालयाचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, गावकरी मंडळी उपस्थित होते.

   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांबरोबरच गुरुदेव सेवा मंडळ आष्टीचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी तसेच सर्व गावातील मंडळींचे मुलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये