ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे सिमेंट चोरी प्रकरणाचा वरोरा पोलिसांकडून पर्दाफाश

२४ तासांत आरोपी जेरबंद; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

राजेंद्र मर्दाने, वरोरा

वरोरा : रेल्वेच्या कामासाठी आणलेल्या सिमेंट चोरी प्रकरणात वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उल्लेखनीय कामगिरी करत आरोपींना जेरबंद केले असून, चोरीसाठी वापरण्यात आलेले बुलेरो पिकअप वाहन व सिमेंटसह एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०१/०२/२०२६ रोजी रुपनगर, बिहार येथील रहिवासी फिर्यादी राहुल कुमार नुनबाबु रजत यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार दाखल केली होती. वणी रोड उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या रेल्वेच्या कामासाठी आणलेले ८५ पोते सिमेंट (कि.अ. २९,००० रुपये) वणी बायपास उड्डाणपुलाखाली रेल्वे ट्रॅकजवळ ठेवण्यात आले होते. मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदर सिमेंटची चोरी केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सपोनि शरद एस. भस्मे यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी व वाहनाचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान अवघ्या २४ तासांत चोरीसाठी वापरण्यात आलेले बुलेरो पिकअप वाहन (कि.अ. ४,००,००० रुपये) तसेच १०० पोते सिमेंट (कि.अ. ३०,००० रुपये) असा एकूण ४,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, तसेच वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि शरद एस. भस्मे, पोहवा संदीप मुळे, पोका विशाल राजुरकर, पो.अं. सौरभ कुलथे व पो.हवालदार सुकराज यादव नवघरे यांनी सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये