चौथ्या दिवशी उपोषणकर्ता मुन्नेश्वर बदखल अस्वस्थ, तर तिकडे अपघाताची मालिका सुरूच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तेलवासा पिपरी मार्गाचे मजबुतीकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम असलेल्या मुन्नेश्वर बदखल यांची आज चौथ्या दिवशी प्रकृती खालावली आहे.१६ तारखेपासून सुरू आंदोलनाची पाहिजे ती दखल अजूनही प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही जणू काही प्रशासन उपोषणकर्त्याच्या जीवावर उठले की काय? अशी शंका उपस्थित होत असतानाच आज दिनांक १९ ला तेलवासा, ढोरवासा येथून शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सायकलीना अवजड वाहनाने कट मारल्याने पाच ते सहा मुली क्षतिग्रस्त झाल्या.
यामुळे संतप्त तेलवासा सरपंच आकाश जुनघरे व पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवजड वाहतूक रोखून धरली. या रस्त्यावर अपघात होणे ही नवलाईची बाब राहिली नसून दर दिवशी किरकोळ अपघात हे पाचवीलाच पुजले आहे. उपोषणकर्ते मुन्नेश्वर बदखल यांची खालावलेली प्रकृती व मुलींच्या झालेल्या अपघाताने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केल्या जातो आहे.
रेती उपसा व अवजड वाहनातून वाहतूक यामुळे या पादचारी रस्ता साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता कोण्हीच नाकारू शकत नाही.
आज शिवसेनेचे मुकेश जिवतोडे, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते, शिंदे सेनेचे युवा नेते हर्षल शिंदे, शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख नंदू पढाल, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बदखल, निपॉन चे प्रवीण सातपुते, ललित बदखल यांनी गंभीर दखल घेत उपोषणकर्त्याच्या जनहिताच्या मागणीवर प्रशासनाने तत्काळ तोडगा काढावा याकरिता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
वृत्त लिहीपर्यंत अजूनही तोडगा निघालेला नाही.



