पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पतीकडून चाकू हल्ला
गालावर वार करून जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :- शहरातील सुरक्षा नगर परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक ४ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत पत्नीच्या डाव्या गालावर वार होऊन ती जखमी झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुवर्णा दिपक नागापूरे (वय ४० वर्ष) रा. सुरक्षा नगर, भद्रावती यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती दिपक विठ्ठल नागापुरे (वय ५२ वर्ष) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पतीने चाकू उचलून पत्नीच्या डाव्या गालावर वार केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. वृत्त लिहीपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अकबर पठाण करीत आहेत.
तालुक्यात वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना
दरम्यान, भद्रावती तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत कौटुंबिक वादातून गंभीर गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सख्या भावाने बहिणीची हत्या करून आईला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. तसेच शेत विक्रीच्या वादातून मुलाने वडिलांना काठीने मारहाण करून जखमी केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे
सतत घडणाऱ्या या घटनांमुळे तालुक्यात कौटुंबिक तणाव व हिंसाचाराचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.



