ताज्या घडामोडी

खा. धानोरकर गटाला ठेंगा, वडेट्टीवार गटाची कुरघोडी – स्थाई समितीत खासदार समर्थक सदस्य नाही

मनपा गटनेत्याची हकालपट्टी करा - काँग्रेस शहराध्यक्ष संतोष लहामगे

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर मनपा मधे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूनही वर्चस्वाच्या वैयक्तिक वादातून गल्लीतील गोंधळ थेट दिल्लीपर्यंत नेऊनही खा. प्रतिभा धानोरकर व आ. विजय वडेट्टीवार ह्यांनी पक्षाहितासाठी एकत्रित न येता केवळ आपले अहंकार जोपासत मनपातील सत्ता घालविली. भाजपा नेते आ. सुधीर मुनगंटीवार ह्यांनी अत्यंत शिताफीने पडद्यामागे ठोस भुमिका वठवून शिवसेना उबाठा गटाशी जुळवून घेत मुत्सद्दीपणाने पुन्हा एकदा चंद्रपूर मनपावर भगवा फडकवला. मात्र असे होऊनही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तसेच नगरसेवकांनी कुठलाही धडा घेतला नसल्याचे स्थाई समिती निवडणुकीतील घडामोडींवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असुन स्थाई समितीत आपल्या वाट्याला आलेल्या सर्व सातही जागांवर आ. विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची निवड झाल्याने खा. प्रतिभा धानोरकर गट संतप्त झाला असुन चंद्रपूर शहर अध्यक्ष संतोष लहामगे ह्यांनी मनपा गटनेत्याच्या पदावरून हकालपट्टीची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर महानगर पालिकेच्या स्थाई समितीची बहुप्रतिक्षित निवडणूक दिनांक 5 मार्च रोजी पार पडली. नगरसेवकांच्या संख्याबळावरून काँग्रेसच्या वाट्याला सात सदस्य आले होते. नियमाप्रमाणे काँग्रेस गटनेत्याने स्थाई समिती सदस्यत्वासाठी पक्षाकडून नगरसेवकांची नावे पाठविली. मनपा सभागृहात महापौर संगीता खांडेकर ह्यांनी स्थाई समिती सदस्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे केवळ वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची निवड झाल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

ह्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष लहामगे ह्यांनी इतर नगरसेवक व नेत्यांसह चंद्रपूर येथिल विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे गटनेते राजेश अडूर ह्यांच्यावर आगपाखड केली असुन त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. संतोष लहामगे ह्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांनी आ. विजय वडेट्टीवार व खा. प्रतिभा धानोरकर ह्यांच्याशी चर्चा करून स्थाई समितीच्या सदस्यांची नावे ठरविली व ती यादी भ्रमणध्वनीवरून गटनेते राजेश अडूर ह्यांना सांगितली होती मात्र गटनेत्यांनी प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून परस्पर नावे बदलविली व आपल्या गटातील नगरसेवकांची नियुक्ती केली.

सदर प्रकार हा पक्षशिस्तीचा भंग असुन हा प्रदेशाध्यक्षांचा अपमान आहे. ह्याप्रकारे पक्षनेतृत्वाला आव्हान देणाऱ्या गटनेत्याची पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली असुन पक्षाच्या शिस्तीचा भंग होऊ नये तसेच बंडखोरीला आळा बसवा ह्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे वडेट्टीवार गटही नाराज असल्याची माहिती असुन काही प्रभागातील दोन सदस्यांना स्थाई समितीत स्थान देण्यात आले तर बऱ्याच प्रभागातील नगरसेवकांना डावलण्यात आले असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असुन काही नगरसेवक आता खासदार गटाच्या संपर्कात असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये