सीटीपीएस ॲश डंपिंगवरून दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष : चाकू-कुर्हाडीने हल्ला, एक मजूर जखमी
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी : सहा आरोपींवर गुन्हे, एकास अटक, ११ अनोळखींचा शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील सायवन परिसरात सीटीपीएस (चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र) येथून निघणाऱ्या ॲश (राख) डंपिंगच्या कंत्राटावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या संघर्षात चाकू व कुर्हाडीचा वापर झाल्याने एक मजूर जखमी झाला आहे. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे नोंदवून एकास अटक केली आहे. तसेच ११ अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे.
सायवन परिसरात चाकूने हल्ल्याचा प्रयत्न
दि. १ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास जुन्या सायवन परिसरातील ॲश डंपिंग ठिकाणी पहिली घटना घडली. फिर्यादी शाकीब शकील काजी (वय २३, रा. घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर) हा हासीम खान यांच्या नावावरील ॲश लोडिंगच्या कामावर गाड्यांचे नंबर नोंदविण्याचे काम करीत होता.
यावेळी कारमधून आलेल्या संगम सागोरे (रा. मित्रनगर, रामनगर, चंद्रपूर), अर्जुन मुंडे, अशोक मुंडे व संतोष जुनघरे (रा. सीटीपीएस परिसर, चंद्रपूर) यांच्यासह इतर अनोळखी इसमांनी काम थांबविण्यास सांगून वाद घातल्याचा आरोप आहे. संगम सागोरे याने चाकूने पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला, तर इतरांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात सुफीयान शकील शेख यालाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भादंवि (बीएनएस) कलम १०९(१), १२६(२), २९६, १८९(१)(२)(४), १९०, १९१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
घोडपेठ शेतशिवारात ट्रकची काच फोडली
याच दिवशी दुपारी २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान घोडपेठ शेतशिवारात दुसरी घटना घडली. फिर्यादी रवी बलय्या अटकूरवार (वय ३८, रा. नेताजी नगर, विजासन, भद्रावती) हे सौ. बबली संतोष जुनघरे यांच्या ट्रकवर चालक म्हणून कार्यरत आहेत.
आवंडा येथील ॲश डंपिंगवरून राख भरून शेतात आणल्यानंतर ६ ते ७ जण मोटारसायकलीवर येऊन ट्रक अडविल्याचा आरोप आहे. त्यापैकी एका इसमाने कुर्हाडीने ट्रकची काच फोडली तसेच मालक संतोष जुनघरे यांना धंदा बंद करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने चालक शेतातून पळून गेल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी आसीम खान ताडाळी व श्रीकांत काळे यांच्यासह इतर सात अनोळखी इसमांवर बीएनएस कलम ३२९(३), १८९(२)(४), १९१(३), २९६, ३५१(३) व ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंत्राटावरून वाद उफाळला
प्राथमिक तपासात सीटीपीएसमधील ॲश डंपिंगच्या कंत्राटावरून दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, चाकू व कुर्हाडीचा वापर झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भद्रावती पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये सहा नामनिर्देशित आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले असून एकास अटक केली आहे. उर्वरित आरोपी व ११ अनोळखी इसमांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.



