ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ११००० नेत्रदान संमती फॉर्म भरण्याचा संकल्प

नेत्रदानातून समाजप्रबोधनाचा आदर्श : नेत्रदान ही चळवळ व्हावी संस्थाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    लोकसेवा मंडळ भद्रावती संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथे २० ते २५ जानेवारी पर्यंत उत्साहात करण्यात येत आहे.

गेली ७५ वर्षे ही संस्था केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान देत आहे.

संस्थेच्या या सामाजिक कार्यात नेत्रदान जनजागृती हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य ठरत आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार हे सातत्याने नेत्रदान या समाजोपयोगी कार्यासाठी कार्यरत असून लोकमान्य विद्यालय, गुरुदेव सेवा मंडळ ,संघ परिवाराच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ५,००० नागरिकांकडून नेत्रदान संमती फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तब्बल ११,००० नेत्रदान संमती फॉर्म भरून घेण्याचा संकल्प करण्यात आला असून नेत्रदानासारखे पवित्र कार्य एका चळवळीच्या स्वरूपात उभे राहावे, असा चंद्रकांत गुंडावार यांचा मानस आहे.

या उपक्रमातून आतापर्यंत भद्रावती परिसरातील सुमारे ३७ नागरिकांनी प्रत्यक्ष नेत्रदान करून दृष्टिहीनांना नवा प्रकाश दिला आहे. श्रीमती बोरा ताई, यामुनाबाई यशवंतराव शिंदे यांच्यापासून प्रत्यक्ष नेत्रदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत सागरा येथील नथुजी नेमूदे व भद्रावती येथील लटारी पिंपळकर यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे.

लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय जगन्नाथ गावंडे, लोकमान्य परिवार व संघ परिवार यांचा नेत्रदान जनजागृतीच्या या कार्यात सक्रिय सहभाग आहे.

नेत्रदानाबाबत सकारात्मक जनजागृती झाल्याने चीर घरात नेलेल्या चंद्रपूर व भद्रावती येथील तीन प्रेतांचे डोळे काढण्यात आल्याचे चंद्रकांत गुंडावर यांनी सांगितले.

लोकमान्य विद्यालयाच्या प्रांगणात सातत्याने ४४ वर्षांपासून आयोजित केल्या गेलेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या एका कार्यक्रमात ज्या तिघांना डोळे बसविण्यात आले होते अशा तिघांनी आपले मनोगत जवळपास ५००० लोकांच्या समोर व्यक्त केले होते.

तीन वेळा हेडगेवार नेत्र पिढी नागपूर येथून अडीच तासाचा प्रवास करून डॉक्टरांची टीम येऊन त्यांनी डोळे काढण्याचे काम केले होते .तसेच चंद्रपूर येथील डॉक्टर सरदेशपांडे व सन्मित्र मित्र पिढीचे अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर बबन अंदनकर तसेच विविध शासकीय व खाजगी डॉक्टर्स यांचे या कार्यात मोठे सहकार्य राहिले आहे.

नेत्रदान जनजागृती ही बाब समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. “मरणोत्तरही आपण इतरांच्या जीवनात उजेड निर्माण करू शकतो” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचवला जात आहे.

नेत्रदानासाठी कोणतीही व्यक्ती वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नेत्रदान संमती फॉर्म भरू शकते. नेत्रदानासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. मृत्यूनंतर ६ तासांच्या आत नेत्र काढणे आवश्यक असते. चष्मा वापरणारे, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात. मात्र एचआयव्ही, रेबीज, कावीळ (जॉन्डिस) यांसारख्या गंभीर संसर्गजन्य आजारांमध्ये नेत्रदान करता येत नाही, अशी माहिती जनजागृतीदरम्यान दिली जात आहे.

लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा हा उपक्रम समाजात नेत्रदानाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा असून इतर संस्थांसाठी आदर्श ठरत आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षणासोबतच समाजभान जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये