ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवले नवनवीन कृषी तंत्रज्ञान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा तर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये कलश सीड्स प्रा. लिमिटेड, ईश्वेद टिशू कल्चर लॅब आणि मातृतीर्थ, सिंदखेड राजा या ठिकाणांचा समावेश होता.

कलश सीड्स ,जालना येथे आयोजित अत्याधुनिक पीक प्रदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. या प्रदर्शनामध्ये भाजीपाल्याच्या विविध संकरित वाणांची प्रभावी श्रेणी सादर करण्यात आली होती. प्रति झाड उत्कृष्ट फळधारणा दिसून येत असून, व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने या वाणांची मोठी क्षमता असल्याचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ कशी होऊ शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

यावेळी कलश सीडचे ढोबळी मिरची टोमॅटो उत्कृष्ट वाणाचे निर्माते गणेश कंकाळ व टोमॅटोच्या उत्कृष्ट वाणाचे निर्माते सचिन बनकर यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान माहिती दिली. फिल्ड भेटीदरम्यान कंपनीच्या आंतरराष्ट्रीय बियाणे बाजारातील उपक्रमांचे नेतृत्व करणारे विवेक पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना जागतिक संधींबाबत मार्गदर्शन केले.

कलश सीडचे संचालक समीर अग्रवाल व त्यांच्या टीमनेही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.ईश्वेद टिशू कल्चर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना केळी,बांबू व खजूर याबद्दल टिशू कल्चर तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. येथे टिशू कल्चरच्या विविध प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. ईश्वेद बायोटेकचे डायरेक्टर संजय वायाळ व अक्षय वायाळ त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावसायिक दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले.सहलीच्या शेवटी मातृतीर्थ, सिंदखेड राजा येथे विकास ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या जिजाऊ सृष्टी व राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी असलेल्या राजवाड्या बद्दल माहिती दिली.

या शैक्षणिक सहलीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, प्रा. योगेश चगदळे व प्रा. गणेश घुगे व १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उद्योगविश्व आणि सांस्कृतिक वारसा यांचा समन्वित अनुभव मिळाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये