जिजाऊ आणि विवेकानंदांच्या विचारांतून घडेल समर्थ राष्ट्र : प्रा. प्रवीण देशमुख
नांदा येथे शिवविचारांचा जागर!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा फाटा :- “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पान नव्हे, तर या देशाचा स्वाभिमान आहेत. जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेली शिवरायांची तलवार जर आजच्या तरुणांच्या विचारात उतरली, तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाल्यासारखे होईल,” अशा शब्दांत सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते प्रा. प्रवीण देशमुख यांनी समाजातील मरगळ झटकण्याचे आवाहन केले.
नांदा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘प्रेरणादायी शिवचरित्र’ व्याख्यानात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव समिती व जगद्गुरु तुकाराम महाराज मंडळ यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात शिवविचारांचे वादळ अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रा. प्रवीण देशमुख यांनी आपल्या रोखठोक शैलीत मांडले की, “शिवाजी महाराज हे काही आकाशातून पडलेले दैवत नव्हते, तर जिजाऊंनी बालवयापासून त्यांच्यावर केलेले संस्कार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण यामुळे ते ‘रयतेचे राजा’ बनले.” रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगून जिजाऊंनी केवळ राजा घडवला नाही, तर गुलामगिरी नाकारण्याची जिद्द निर्माण केली. तोरणा किल्ल्यावरील विजयापासून ते स्वराज्याच्या स्थापनेपर्यंत प्रत्येक पावलावर जिजाऊंचे विचार मार्गदर्शक ठरले, हे त्यांनी विविध दाखल्यांसह सिद्ध केले.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा धागा शिवरायांच्या जीवनाशी जोडताना प्रा. देशमुख म्हणाले, “विवेकानंदांनी दिलेला ‘राष्ट्रवाद’ आणि शिवरायांचे ‘स्वराज्य’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” युवकांनी केवळ फोटोसमोर नतमस्तक न होता, शिवरायांचे प्रशासन, स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान आणि ‘रयतेचा एक काडीचाही हिस्सा घेऊ नका’ हे नीतिमूल्य आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “शिवराय हे केवळ तलवारीचे नव्हे, तर सुशासनाचे प्रतीक होते,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यानी शिवरायांच्या पराक्रमावर आधारितजे शिवगीतांवर अंगावर शहारे आणणारे नृत्य सादर केले. संपूर्ण सभागृह शिवगर्जनांनी दुमदुमून गेले होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच मेघा पेंदोर होत्या. उद्घाटक म्हणून प्रा. देविदास गायकवाड व कल्याण जोगदंड (गटशिक्षण अधिकारी) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवचंद्र काळे, प्रा. डॉ. अनिल मुसळे, डॉ. बाळासाहेब चौधरी, वैशाली भोयर, संजय मुसळे, चंद्रकांत पांडे, पुरुषोत्तम निब्रड, हरिदास राऊत यांसह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन रामकृष्ण रोगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश लोंढे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य ग्रामवासीय उपस्थित होते.



