फुटाणा येथे रस्त्यात ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या नांगराला दुचाकीची धडक
चालक किरकोळ जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : फुटाणा येथे रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या नांगराला दुचाकीची धडक लागून एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज (३ मार्च) धुळवड/धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ राजेराम मळावी व प्रतीक लाला जीवन कर हे दोघे पोंभुर्णा येथून नांदगावकडे दुचाकीने जात होते. फुटाणा चेकपोस्ट परिसरात रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरचा नांगर ठेवलेला असल्याने त्याला दुचाकीची धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्यामध्ये दशरथ मळावी यांना किरकोळ दुखापत झाली. चालकाने वेळीच सावरल्यामुळे मोठा अपघात टळल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने मदत करत दोघांनाही रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी नेले. नेहरू मोरे यांनी बंडू बुरांडे यांना फोन करून बोलावले. त्यानंतर त्यांच्या चारचाकी वाहनातून जखमींना पोंभुर्णा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून दोघांनाही सुखरूप घरी सोडण्यात आले.
दरम्यान, जखमी झालेले दोघेही सातारा तुकोबा येथील रहिवासी असून काही कामानिमित्त नांदगावकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. गावकऱ्यांनी रस्त्यावर शेतीची अवजारे किंवा वाहने बेपर्वाईने ठेवू नयेत, अन्यथा अशा अपघातांना आमंत्रण मिळते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.



