आष्टी तालुक्यात चार ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : तहसील कार्यालय आष्टीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा एक अंतर्गत महसूल मंडळाच्या ठिकाणी ४ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना विविध सेवा उपलब्ध होणार असल्याने शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत दि.७ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय साहूर, दि.१४ मार्च रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर अंतोरा, दि.१० एप्रिल रोजी ग्रामपंचायत तळेगाव तर दि.१७ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालय आष्टी येथे शिबिर होणार आहे.
या समाधान शिबिरात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यात प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायदा-तत्काळ संपा, अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, नागरी सुविधा, एक खिडकी व्यवस्था, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पीएम किसान निधी, सर्वासाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप करणे, तुकडेबंदी कायद्याबाबतची प्रकरणे निकाली काढणे ध इतर विभागाशी निगडीत कामे केली जाणार आहे.
शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, तक्रारीचे निवारण आणि प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह आपल्या मंडळातील शिबिरास उपस्थित रहावे व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आष्टी तहसीलदार यांनी केले आहे.



