नागपूर येथे पट्टे वाटपाचा कार्यक्रम; चंद्रपूरच्या प्रलंबित प्रकरणांवर चर्चा
चंद्रपुरातील पट्टे वाटप प्रक्रियेला गती देण्याचे महसूलमंत्री याचे निर्देश

चांदा ब्लास्ट
नागपूर येथे आयोजित पट्टे वाटपाच्या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार किशोर जोरगेवार यांना विशेष आमंत्रण दिले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील पट्टे वाटपाच्या प्रक्रियेबाबत सविस्तर व नियोजनात्मक चर्चा करण्यात आली असून, या प्रक्रियेला आणखी गती देण्याचे निर्देश ना. बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला चंद्रपूर आणि घुग्घुस येथील पट्टे वाटपाचा विषय आता मार्गी लागला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत सदर प्रक्रिया यशस्वी करण्याच्या दिशेने प्रयत्न केले होते. परिणामी, आता चंद्रपूर येथेही कायमस्वरूपी पट्टे वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः या विषयात जातीने लक्ष घातले असून, मुंबई आणि चंद्रपूर येथे सदर विषयासंदर्भात त्यांनी बैठका घेतल्या आहेत.
दरम्यान, आज नागपूर येथे पट्टे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी चंद्रपूरातील पट्टे वाटप प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पट्टे वाटपाशी संबंधित विविध प्रलंबित प्रकरणांची माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांना दिली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित बाबी गांभीर्याने जाणून घेतल्या तसेच जिल्ह्यातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, चंद्रपूर येथे पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून ती अधिक गतिशील करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुषंगाने प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पट्टे वाटप प्रक्रिया आणखी गतिशील करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांना गती मिळून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.



