ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनजातीय गौरव वर्षानिमित्त आदिवासी अस्मिता व परिवर्तनाच्या प्रवासावर चिंतनपर चर्चासत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या जनजातीय गौरव वर्षाच्या निमित्ताने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील आदिवासी अध्यासन केंद्र आणि विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘आदिवासी समाजाच्या गौरवांची परंपरा आणि परिवर्तनाची वाटचाल’ या विषयावर चिंतनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथील डॉ. विठ्ठल एस. आत्राम उपस्थित होते. आपल्या अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक व्याख्यानात त्यांनी आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक गौरवपरंपरा, स्वातंत्र्यलढ्यातील मोलाचे योगदान, सांस्कृतिक अस्मिता आणि समकालीन सामाजिक परिवर्तन प्रक्रियेचा शास्त्रशुद्ध आढावा घेतला.

बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या स्वाभिमानाच्या चळवळीचा संदर्भ देत त्यांनी आदिवासी समाजाच्या संघर्षमय इतिहासाला राष्ट्रनिर्मितीच्या व्यापक परिप्रेक्ष्यात स्थान दिले. शिक्षण, संविधानिक अधिकार, सामाजिक न्याय आणि स्वावलंबन यांच्या माध्यमातून परिवर्तनाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टी आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

या चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयातील मराठी विभाग, इतिहास विभाग, समाजशास्त्र विभाग तसेच आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गंगाधर लांडगे यांनी व्यक्त केले.

चर्चासत्रात प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रश्नोत्तर सत्रात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले तर भविष्यातही अशा शैक्षणिक व समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये