ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसच्या भारतीय संविधान चौकाच्या विकास व सुशोभीकरणाची मागणी

आकर्षक भारतीय स्तंभ उभारण्याचा प्रस्ताव

चांदा ब्लास्ट

घुग्घुस/चंद्रपूर : शहरातील प्रमुख भारतीय संविधान चौकाच्या विकास, विस्तारीकरण आणि सुशोभीकरणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश लटारी डोंगे तसेच ब्रिथ ऑफ लाइफ मल्टीपरपज सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष प्रणयकुमार शंकर बंडी यांनी चौकाचा विस्तार करून मध्यभागी आकर्षक भारतीय स्तंभ उभारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा चौक शहराची नवी ओळख ठरेल आणि नागरिकांसह पर्यटकांनाही आकर्षित करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

महेश लटारी डोंगे यांनी सांगितले की, भारतीय संविधान चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. या चौकापासून अल्प अंतरावर घुग्घुस पोलीस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, नायब तहसीलदार कार्यालय, शासकीय रुग्णालय, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, एसीसी अदानी सिमेंट कंपनी, बँक ऑफ इंडिया, नगर परिषद कार्यालय, सीडीसीसी बँक, शाळा तसेच प्रमुख बाजारपेठ आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणांच्या मध्यभागी असलेल्या या चौकाचा आधुनिक पद्धतीने विकास आणि सुशोभीकरण होणे शहराच्या प्रतिष्ठेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी सुचविले की, चौकाचे रुंदीकरण करून रस्त्याच्या मध्यभागी आकर्षक भारतीय स्तंभ उभारण्यात यावा. तसेच हरित परिसर, अत्याधुनिक प्रकाशयोजना आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था विकसित करून हा चौक शहराचे प्रमुख आकर्षण बनवावा. यासाठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, बांधकाम सभापती, नियोजन व विकास सभापती तसेच मुख्याधिकाऱ्यांनी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

महेश डोंगे यांनी पुढे सांगितले की, नगर परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यास शहरातील प्रमुख औद्योगिक कंपन्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, एसीसी अदानी सिमेंट कंपनी आणि डब्ल्यूसीएल यांनी त्यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सामाजिक दायित्व) निधीतून या प्रकल्पासाठी सहकार्य करावे. त्यामुळे भारतीय संविधान चौकाला आधुनिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होईल.

दरम्यान, ब्रिथ ऑफ लाइफ मल्टीपरपज सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष प्रणयकुमार शंकर बंडी यांनी सांगितले की, भारतीय संविधान चौकात लावण्यात येणाऱ्या बॅनर्समुळे अनेकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा झाकला जातो, त्यामुळे चौकाच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. या संदर्भात नगर परिषद घुग्घुस आणि जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना अनेक वेळा लेखी निवेदन देऊन पुतळ्यासमोरील तसेच चौकात दीर्घकाळ लटकणारे जुने व बेकायदा बॅनर्स हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही.

प्रणयकुमार बंडी यांनी सांगितले की, शहर स्वच्छ, सुंदर आणि सुबक ठेवण्यासाठी चौकात दीर्घकाळ लावलेले बॅनर्स तातडीने हटविणे आवश्यक आहे. भारतीय संविधान चौक हा केवळ वाहतुकीचा केंद्रबिंदू नसून शहराची ओळखही आहे. त्याचा नियोजनबद्ध विकास आणि सुशोभीकरण झाल्यास तो घुग्घुसची नवी ओळख ठरू शकतो.

भारतीय संविधान चौकाच्या विकास, सुशोभीकरण आणि स्वच्छतेसाठी प्रशासन, नगर परिषद आणि औद्योगिक समूहांनी संयुक्तपणे पुढाकार घेऊन तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी दोन्ही सामाजिक प्रतिनिधींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये