ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरकरांना प्रवासी रेल्वेची प्रतीक्षा श्रीकांत मोहारे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राज्य व देशात सिमेंट सिटी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला अद्याप प्रवासी रेल्वे सेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातून अनेक वर्षांपासून रेल्वे रूळ अस्तित्वात असून मालगाड्यांची नियमित वाहतूक सुरू आहे. मात्र प्रवाशांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गडचांदूर येथे प्रवासी रेल्वे त्वरित सूरू करण्याची मागणी येथील रहिवासी श्रीकांत मोहारे यांनी केली आहे.

गडचांदूर हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नागरिक येथे वास्तव्यास आहेत. प्रवासी रेल्वे नसल्याने दळणवळणासाठी बससेवा किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय आणि प्रवास खर्चात वाढ होत आहे.

या प्रश्नाबाबत यापूर्वी अनेक वेळा राजकीय पातळीवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. काही वेळा सहमती मिळाल्याची माहितीही समोर आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ठोस पाठपुरावा आणि निर्णयाच्या अभावामुळे ही मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचे चित्र आहे.

गडचांदूर व परिसरात माणिकगड, नारंडा, आवाळपूर आणि उपरवाही येथे चार मोठे सिमेंट उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांतून दररोज कोट्यवधी रुपयांची सिमेंट रेल्वेमार्गे आयात-निर्यात केली जाते. रेल्वे पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही प्रवासी रेल्वे नसणे ही बाब आश्चर्यकारक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, शेगाव–भुसावळ प्रवासी रेल्वे जी सध्या बल्लारपूरवरून सुटते, ती गडचांदूरवरून एक तास आधी सुरू केल्यास कोरपना, आंध्रा, वणी, आदिलाबाद, राजूरा, जिवती व मराठवाडा भागातील प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

प्रवासी रेल्वे सुरू झाल्यास कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी व शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असून शहराच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा श्रीकांत मोहारे यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये