महाशिवरात्रीनिमित्त महाशिवलिंग स्थळी भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी
आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत महाशिवरात्री नियोजन बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट
आगामी महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, महानगर चंद्रपूरच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सोयी-सुविधा, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची आखणी याबाबत आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. महाशिवरात्रीचा कार्यक्रम भक्तिभावाने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा तसेच चंद्रपूरकरांसह बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळपासून रुद्राभिषेक पूजा, महाआरती, शिव-पार्वती विवाह सोहळा, भजनसंध्या तसेच प्रसाद वितरण असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित समित्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारून नियोजनबद्ध तयारी करावी, असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले. बैठकीस पक्षाचे पदाधिकारी, महाशिवलिंग मंदिर सेवा समितीचे सदस्य, सर्वमित्र संघ क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



