ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतमाल घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण अपघात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ शेतमाल घेऊन परतणाऱ्या एका ट्रॅक्टरला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह गोसेखुर्द च्या कालव्यात उलटला, यामध्ये एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.

गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळोधी खुर्द येथील रहिवासी विश्वनाथ भिवणकर (वय ५५) यांच्या शेतातील तुरीच्या पेंढ्या आणण्यासाठी गोवर्धन मेश्राम यांच्या मालकीचा ट्रॅक्टर शेतात गेला होता. शेतातून तुरीच्या पेंढ्या ट्रॉलीमध्ये भरून परतत असताना, मुई ते तळोधी खुर्द रोडवरील गोसेखुर्द कॅनलजवळ ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रॅक्टर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नहरात उलटला.

या अपघातावेळी ट्रॅक्टर चालक दीपक अलाम (वय ४०) हा दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवत असल्याने त्याला ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवता आले नाही, परिणामी हा भीषण अपघात घडला. यात विश्वनाथ भिवणकर (वय ५५ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सहकारी गिरीधर कन्नाके (वय ५४ वर्ष) जखमी असून त्यांच्यावर गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून एकाचा बळी घेणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये