ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतातील आंजनाच्या झाडावर अस्वलीचे बस्तान ; कापूस तोडणीसाठी मजूर सापडेना 

देवई येथील घटना ; अस्वलीने जमावावर हल्ला करण्याचा केला प्रयत्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :- तालुक्यातील देवई येथील एका शेतात झाडावर अस्वलीने बस्तान मांडल्याची घटना उघडकीस आली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अस्वलीच्या वावरामुळे शेतातील कापूस व तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कापूस तुडवल्या गेले आहे व अनेक झाडे मोडली गेली आहे.अस्वल शेतात असल्याचे लक्षात आल्याने कापूस तोडणीसाठी मजूर शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील देवई येथील रामचंद्र इष्टाम यांच्या सर्व्ह नं. २५६ मध्ये १ हेक्टर शेतात कापूस व तुळीची लागवड करण्यात आली आहे.मात्र शेतातील आंजनाच्या झाडावर अस्वलीने बस्तान मांडले.शेतकऱ्याला सदर बाब लक्षात येताच त्यांनी गावकरी व वनविभागाला सुचना केली.दिवसभर शर्थीचे प्रयत्न केले.झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर अस्वलीने आंजनाचे झाड सोडून बाभळीच्या झाडावर चढले.यादरम्यान तीने उपस्थित गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला होता.संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अस्वलीला खाली उतरवण्याचा प्रयत्न झाला मात्र अस्वलीने जागा सोडली नाही.

कापूस तोडणीसाठी शेतात गेलेल्या मजुरांना अस्वल दिसताच त्यांनी तात्काळ माघार घेतली.सध्या शेतात कापूस व तुरीचे पीक उभे असतानाच अस्वलाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे.रात्रीच्या वेळी अस्वल शेतशिवारात मुक्त संचार करत असल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.अस्वलाच्या भीतीपोटी अनेक शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याने कापूस वेचणीसह अन्य शेती कामे खोळंबली आहे.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. वनविभागाकडून अस्वलीचा सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे.

मागील तीन दिवसांपासून अस्वल माझ्या शेतात असल्याने कापूस व तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे.कापूस तोडणीसाठी मजूर शेतात येण्यासाठी घाबरत आहे.तात्काळ अस्वलीचा बंदोबस्त वनविभागाने करावे.व तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी

                     -रामचंद्र इष्टाम, शेतकरी देवई

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये