छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये ‘ॲनिमेशन आणि डिजिटल दुनियेत करिअर’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान
माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कै. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ “व्याख्यानमाला – तिसरे पुष्प”चे आयोजन

चांदा ब्लास्ट
छोटूभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कै. स्वप्नील महावादीवार स्मृतीप्रित्यर्थ आयोजित “व्याख्यानमाला – तिसरे पुष्प” अंतर्गत ‘ॲनिमेशन आणि डिजिटल दुनियेत करिअर’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना सशक्त, जागरूक व भविष्योन्मुख नागरिक घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक राजीव मानकर सर, पर्यवेक्षक विकास निंबाळकर सर, सुदर्शन बरापात्रे सर, त्रिशुल बम सर, सुहास पडोळे सर, प्रकाश होळंबे सर, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे रामू खांडरे, धीरज साळुंके, पराग जवळे, चंद्रकांत कोतपल्लीवार, जितेंद्र मशारकर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व अनुभवी वक्ते श्री. अभिषेक आचार्य यांनी विद्यार्थ्यांना ॲनिमेशन व डिजिटल क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. ॲनिमेशन, व्हीएफएक्स, ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग अशा क्षेत्रांमध्ये आवश्यक कौशल्ये, आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व, तसेच या क्षेत्रातील भविष्यातील रोजगाराच्या व्यापक शक्यता त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केल्या. डिजिटल माध्यमांमध्ये सर्जनशीलतेसोबतच सूचनात्मक (क्रिएटिव्ह) मेंदूचा कसा प्रभावी वापर करता येतो, यावरही त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
आपल्या मागील २१ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे श्री. आचार्य यांनी या क्षेत्रात करिअर करताना व्यवसाय कसा सुरू करायचा, स्वतःची ओळख कशी निर्माण करायची आणि जागतिक स्तरावर काम करण्याच्या संधी कशा उपलब्ध आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. जग वेगाने डिजिटलाइज होत असल्यामुळे रोजगाराच्या संधी आता स्थानिक स्तरावरच निर्माण होत असून, विद्यार्थ्यांना नोकरीसाठी दूर शहरांमध्ये स्थलांतर करण्याची गरज उरत नाही, हा महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.
याशिवाय नागपूर येथे फिल्म सिटी सुरू करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना लक्षात घेता, जर आवश्यक कौशल्यसंपन्न मनुष्यबळ विदर्भातच तयार झाले, तर नागपूर व विदर्भातच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे स्थानिक तरुणांसाठी हे क्षेत्र सुवर्णसंधी ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या व्याख्यानाला प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तरांच्या सत्रातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांची आपल्या शाळेबद्दलची आपुलकी व सध्याच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षकवृंद व माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना ॲनिमेशन व डिजिटल क्षेत्रातील असंख्य करिअर संधींची ओळख होऊन भविष्यासाठी नवी दिशा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.



