पत्रकारांच्या हक्कांचा बुलंद आवाज, पुरोगामी पत्रकार संघाचा संघर्षमय उदय : मनोज मोडक
पुरोगामी पत्रकार संघ, पत्रकारांच्या जीवनाला नवी दिशा देणारा संघर्षमय प्रवास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पत्रकारिता समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.मात्र आजच्या बदलत्या परिस्थितीत अनेक पत्रकार सामाजिक व सुरक्षिततेच्या अडचणींना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांना आधार, दिशा व बळ देणारा पुरोगामी पत्रकार संघ हा एक विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून पुढे आला आहे.
आदरणीय विजय सूर्यवंशी सर, संस्थापक-अध्यक्ष, पुरोगामी पत्रकार संघ यांनी पत्रकारांच्या समस्या जवळून पाहून संघटनेची स्थापना केली. तेव्हा आदरणीय बाळासाहेब आडांगळे यांची कार्याध्यक्ष म्हणून योग्य दिशा मिळत आहे. पत्रकारांना केवळ बातमीदार न मानता समाजातील सजग घटक म्हणून सन्मान मिळावा, त्यांचे हक्क अबाधित राहावेत आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभा राहावा, या उद्देशाने संघ कार्यरत आहे.
पुरोगामी पत्रकार संघाने अल्पावधीतच राज्यभर आपली ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर,नागपूर,भंडारा, गोंदिया, अमरावती,अकोला संपूर्ण विदर्भासह पुणे, मुंबई,रायगड, नाशिक नांदेड, बुलढाणा सह इतर राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी ग्रामीण, तालुका व जिल्हा स्तरावरील पत्रकारांना संघटित करून त्यांना कायदेशीर मार्गदर्शन, सामाजिक संरक्षण, प्रशिक्षण तसेच अन्यायाविरोधात व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. पत्रकारांवरील हल्ले, खोटे गुन्हे, दबावतंत्र, मानहानी आणि उपेक्षा अशा अनेक प्रश्नांवर संघ ठामपणे भूमिका घेत आहे.
संघाच्या माध्यमातून पत्रकारांना नवा जीवनमार्ग मिळत असून, “संघटित पत्रकारच सुरक्षित पत्रकार” हा संदेश प्रभावीपणे समाजात पोहोचवला जात आहे. संघाचे नेतृत्व पारदर्शक, संघर्षशील व पत्रकारहितैषी असल्याने राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने संघात सहभागी होत आहेत.
पुरोगामी पत्रकार संघ आज केवळ संघटना न राहता, पत्रकारांच्या आत्मसन्मानाचे, हक्कांचे आणि सुरक्षिततेचे बळकट व्यासपीठ बनले आहे. आदरणीय विजय सूर्यवंशी सर यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला हा संघ पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करत असल्याचे चित्र दिसून येत असून संघाचा आठवा वर्धापन दिन दिनांक 30 डिसेंबर 2025 ला गर्दे सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, बुलढाणा येथे साजरा करण्यात येत आहे.
त्यासाठी महाराष्ट्रातील समस्त पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आव्हान पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष सन्माननीय मनोज मोडक यांनी केले आहे.



