श्रद्धेय अटलजी सुसंस्कृत राजकारणाचा दीपस्तंभ – आ. जोरगेवार
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त भाजप महानगर जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक महान नेते नव्हते, तर ते राष्ट्राच्या आत्म्याशी संवाद साधणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशाच्या राजकारणाला सुसंस्कृतपणा, सहिष्णुता आणि विचारांची उंची दिली. एकंदरित अटलजी हे सुसंस्कृत राजकारणाचा दीपस्तंभ असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पाल, रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, भाजप नेते प्रकाश देवतळे, तुषार सोम, नामदेव डाहुले, बलराम डोडाणी, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, रवी जोगी, प्रदीप किरमे, ॲड. सारिका संदुरकर, दशरथसिंह ठाकुर, माजी नगरसेवक सुषमा नागोसे, संजय बोरघाटे, राकेश बोमावार, प्रदीप शास्त्रकार, निलेश बेलखेडे, हर्षल कानमपल्लीवार आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
अटलजींच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाच्या अनेक ऐतिहासिक टप्प्यांना स्पर्श केला. पोखरण अणुचाचणी, सुवर्ण चतुर्भुज महामार्ग योजना, ग्रामसडक योजना यांसारख्या निर्णयांमुळे देशाची सुरक्षितता आणि दळणवळण व्यवस्था मजबूत झाली. त्यांनी नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराला प्राधान्य दिले. राजकारण करताना विरोधकांशीही सन्मानाने संवाद साधण्याची परंपरा अटलजींनी रुजवली. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांचे विचार, त्यांची मूल्ये आणि त्यांची राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ सारखी आहेत. आज अटलजींच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांना स्मरणात ठेवून समाजहित, लोकहित आणि राष्ट्रहितासाठी काम करण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.



