अखेर चंद्रपूर महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकला
महापौर संगिता खांडेकर तर उपमहापौर प्रशांत दानव

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच, राजुरा
भाजपा उबाठा युतीने केली सत्ता काबीज ; उबाठा गटाला मिळणार स्थाई समितीचे अध्यक्षपद
महानगर पालिकेत कुणाची सत्ता येणार ह्या प्रश्नाचे उत्तर आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीने शहर वासियांना दिले आहे. महापालिकेत शिवसेना उबाठा गटाच्या साथीने भाजपने पुन्हा एकदा भगवा फडकावला असून संगिता खांडेकर ह्यांच्या रूपाने शहराला नव्या महापौर मिळाल्या.
महानगर पालिकेच्या निवडणुकीत जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्याने शहरात सत्ता स्थापनेसाठी जोडतोडीची प्रक्रिया सुरू झाली होती. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या अंतर्गत दुफळीमुळे अखेरपर्यंत बहुमताचे संख्याबळ मिळवु शकला नाही. नगरसेवकांच्या अपहरणाच्या प्रयत्नाचे नाट्य, खा. प्रतिभा धानोरकर व आ. विजय वडेट्टीवार ह्यांच्यातील वर्चस्वाची लढाई दिल्ली दरबारापर्यंत पोहचली व अखेरीस बातम्या पसरविण्याइतके ऐक्य दोन्ही नेत्यांमध्ये झाले मात्र हे ऐक्य महानगर पालिकेवर पक्षाची सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले.
दुसरीकडे, सुरवातीपासूनच पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर पदाची अट ठेऊन भाजप व काँग्रेस ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे ह्यांनी अखेरीस भाजपासोबत हातमिळवणी केल्याने भाजपच्या संगिता खांडेकर ह्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वैशाली महाडोळ ह्यांचा एका मताने पराभव करून महापौर पदावर ताबा मिळविला. राणी हिराई सभागृहात झालेल्या मतदानावेळी एम आय एम चे एक तर वंचितच्या दोन नगरसेवकांनी तठस्थ राहण्याची भुमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाच्या आशांवर पाणी फिरले.
उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मात्र ट्वीस्ट बघायला मिळाला असुन अपक्ष उमेदवार प्रशांत दानव ह्यांनी ईश्वरचिठ्ठीने विजय मिळवुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेस पक्षाने उपमहापौर पदासाठी जानविकास सेनेच्या पप्पू देशमुख ह्यांना पाठिंबा दिला होता. महापौर पदाच्या निवडणुकीत तठस्थ राहणाऱ्या एम आय एम च्या नगरसेवकाने उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीत मतदान केले. वंचितचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित असल्याने काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख व अपक्ष प्रशांत दानव ह्यांना प्रत्येकी 32 मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा ह्यांनी ईश्वरचिठ्ठी टाकली त्यात प्रशांत दानव ह्यांनी बाजी मारून उपमहापौर पद पटकाविले.
नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर ह्यांचे पालकमंत्री अशोक उईके, आ. किशोर जोरगेवार, आ. सुधिर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आ. देवराव भोंगळे ह्यांचेसह पक्षाच्या नेत्यांनी अभिनंदन केले आहे.



