अटल स्मृती वर्षानिमित्त चंद्रपुरात स्वच्छता अभियान
अटल उद्यानातील स्मारक स्वच्छ करून १०० दिवे प्रज्वलित, गरजूंना अन्नधान्य किट वाटप

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त दि. २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘अटल स्मृती वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमांच्या अनुषंगाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार व इंजि. सुभाष कासनगोटटूवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने शहरातील बायपास मार्गावरील अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी अटल स्मृती वर्षाचे चंद्रपूर जिल्हा संयोजक तथा भारतीय जनता पार्टीचे महामंत्री मनोज पाल, इंजि. सुभाष कासनगोटटूवार, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर महानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. याप्रसंगी सविता दंडारे, श्याम कनकम, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, जिल्हा महिला मोर्चा महामंत्री सायली येरणे, मंडळ समन्वयक दिवाकर पुडट्टवार, विजय मोगरे, विनोद पेंडलीवार, पराग मेलोडे, डॉ. रामेटेक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत अटल उद्यान येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाची विशेष स्वच्छता करून स्मारक परिसरासह आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला. उद्यानातील कचरा साफ करून नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वच्छता, राष्ट्रनिर्माण व सार्वजनिक शिस्त यांना दिलेले महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
तसेच अटलजींच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्यान परिसरात १०० दिवे प्रज्वलित करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यासोबतच गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना जिवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून अटलजींच्या ‘अंत्योदय’ विचारधारेचा प्रत्यक्ष कृतीतून सन्मान करण्यात आला.
यावेळी इंजि. सुभाष कासनगोटटूवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी हे केवळ महान नेते नव्हते, तर सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता व राष्ट्रहित यांचे जिवंत प्रतीक होते. त्यांच्या विचारांना स्मरणरूपाने नव्हे, तर कृतीरूपाने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. स्वच्छता, सामाजिक जबाबदारी व गरजूंची सेवा या माध्यमातून आपण अटलजींचे विचार समाजापर्यंत पोहोचवू शकतो.”
या स्वच्छता अभियान व अन्नधान्य किट वाटप कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अटलजींच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा हा उपक्रम असून ‘स्वच्छ भारत – सशक्त भारत’ या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
अटल स्मृती वर्षाच्या निमित्ताने येत्या काळातही चंद्रपूर शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक व लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



