वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग भरतीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या – आ. जोरगेवार
मुंबई मंत्रालयात आमदार किशोर जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट

चांदा ब्लास्ट
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग अंतर्गत सन २०२३ मध्ये राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधील ‘सुतार’ पदावरील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, अशी ठोस मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बुधवारी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी सदर मागणीच्या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन ना. हसन मुश्रीफ यांना दिले. डी.एम.ई.आर. अंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसाठी सन २०२३ मध्ये सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत ‘सुतार’ पदाचाही समावेश होता. माजी सैनिकांच्या रिक्त राहिलेल्या जागा संबंधित प्रवर्गातून रूपांतरित करून भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी रीतसर परवानगी दिली होती.
या परवानगीनंतर अनेक पदांच्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले असतानाही, ‘सुतार’ पदावरील पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही, ही बाब आमदार जोरगेवार यांनी निदर्शनास आणून दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय कार्यवाहीस विलंब झाला, हे मान्य असले तरी, त्याचा फटका पात्र उमेदवारांना बसू नये, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निवड यादीला एक वर्ष पूर्ण झाल्याने दि. १० मार्च २०२५ रोजी यादी व्यपगत (लॅप्स) झाल्याची नोटीस काढण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने दि. २ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार निवड सूचीची वैधता दोन वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ‘सुतार’ पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवार आता कायदेशीरदृष्ट्या नियुक्तीस पात्र ठरत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणले.
या विषयावर ना. हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक भूमिका दर्शवित, संबंधित विभागाशी समन्वय साधून प्रकरणाचा योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.



