ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार किशोर जोरगेवार हेच चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटविण्यात आल्याच्या अफवा पसरवून राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा डाव खेळण्यात आला. मात्र पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट परिपत्रक काढत आमदार किशोर जोरगेवार हेच चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख असल्याचे जाहीर केल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयाने पक्षातील शिस्त, नेतृत्वावरचा विश्वास आणि आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली आहे.

        तर यावेळी निवडणूक मार्गदर्शक म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, निवडणूक निरीक्षक म्हणून चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार अशोक नेते यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचाही दिर्घानुभवाचा लाभ या निवडणुकीत लाभणार आहे.

काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या घुग्घुसमध्ये भाजप उमेदवाराला तब्बल ६ हजार ८५० मते मिळणे आणि अवघ्या ३४६ मतांनी पराभव होणे, ही बाब साधी नाही. या निकालातून भाजपची वाढती ताकद दिसून आली.

किशोर जोरगेवार हे अचानक राजकारणात आलेले नेते नाहीत. तरुण वयातच विजय राउत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००४ पासून ते स्थानिक राजकारणात सक्रिय असून संघर्ष, संघटन आणि जनसंपर्क या तिन्ही पातळ्यांवर त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. २०१९ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवत त्यांनी ७२ हजार मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवून राजकीय इतिहास घडवला. देशातील सर्वाधिक फरकाने निवडून येणारे ते पहिले अपक्ष आमदार ठरले. २०२४ मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी पुन्हा काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करत जनतेचा विश्वास अबाधित असल्याचे दाखवून दिले.

निवडणुका कागदावर नाही, तर जमिनीवर जिंकल्या जातात, याची जाण जोरगेवारांना आहे. बूथ पातळीवरील व्यवस्थापन, मतदारांची नाडी ओळखण्याची क्षमता आणि विरोधकांच्या हालचाली वाचण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पक्षाचे काम वाढविण्यासाठी त्यांनी गांधी चौक येथे उभारलेले सुसज्ज तीन मजली भाजप कार्यालय, विविध पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश आणि महानगर कार्यकारिणीवर असलेली त्यांची पकड, हे त्यांच्या संघटनात्मक ताकदीचे ठोस उदाहरण आहे. या पक्ष प्रवेशांमुळे आणि पक्षाच्या वाढलेल्या ताकतीमुळे यंदा तब्बल ६०० इच्छुक उमेदवारांनी अर्ज सदर केले आहे.

विकासाच्या मुद्द्यावरही त्यांची बाजू मजबूत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला पट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. पट्टे वाटप प्रक्रिया ही आता सुरु झाली आहे. विविध विकासकामांना गती देणे आणि प्रशासकीय यंत्रणेवर पकड निर्माण करणे, ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत हेच मुद्दे भाजपच्या प्रचाराचा कणा ठरणार आहेत.

महानगरपालिका निवडणूक प्रमुख हे पद केवळ नावापुरते नसून रणनिती ठरवणारे, निर्णय घेणारे आणि विजयाचा मार्ग आखणारे असते. अनुभव, संघटन, जनाधार आणि आत्मविश्वास या सर्व निकषांवर आमदार किशोर जोरगेवार हेच त्या भूमिकेसाठी योग्य आहेत. म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये