खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ मधील त्या बातमीचे तीव्र खंडन
बदनामीचा हेतू असल्याचा आरोप

चांदा ब्लास्ट
२६ डिसेंबर २०२५ रोजी ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली “चंद्रपुरात टायगर जिवंत होता, मग गडचिरोलीत मेला होता का?” तसेच ‘लोकसत समाचार’ वृत्तपत्रातील ‘प्रदेशाध्यक्ष पर जमकर भडकी संसद धानोरकर’ या दोन्ही बातमी पूर्णतः असत्य, कपोलकल्पित आणि माझी राजकीय बदनामी करण्याच्या हेतूने पेरण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहे. काँग्रेस संसदीय बोर्डाच्या बैठकीत राज्याचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा अपमान होईल किंवा त्यांना वाईट वाटेल, असे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. पक्षांतर्गत विषयांचा विपर्यास करून माझ्या नावावर खोटी विधाने चिकटवणे हा पत्रकारितेच्या मूल्यांचा भंग असून, अशा आधारहीन बातम्यांमुळे माझी व पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न हितशत्रूंकडून केला जात आहे, असा घणाघात त्यांनी केला.
मी पक्षाची एकनिष्ठ लोकप्रतिनिधी असून कोणत्याही दबावाला किंवा कुप्रचाराला बळी पडणार नाही. जनता आणि माझ्या प्रिय कार्यकर्त्यांनी अशा खोडसाळ बातम्यांवर विश्वास ठेवू नये. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राने अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणे चुकीचे असून, संबंधित वृत्तपत्राने यावर तात्काळ खुलासा देऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक देखील विधान सभेचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष
संतोष लहामगे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकजुटीने लढली जाणार आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता संघटनात्मक मजबुतीवर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.



