ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेलंगणातील संमेलनाचा विशेष परिसंवाद गाजला

राष्ट्रसंतांचे विचार साहित्य हे सत्याचे दर्शन घडविणारे - श्रीकांत धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    आजच्या मूल्य संक्रमणाच्या काळात राष्ट्रसंतांचे विचार समाजासाठी संजीवनी बुटी ठरू शकतात. राष्ट्रसंतांचे साहित्य हे काळाच्या ओघात नष्ट होणारे नसून सत्याचा आविष्कार करणारे आहे.

 आजही ते जीवन मार्ग दाखवणारे असल्याचे मत राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक तथा परिसंवादाचे अध्यक्ष श्रीकांत धोटे यांनी विसाव्या आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनात व्यक्त केले. तेलंगणा स्टेट येथील आसिफाबाद जवळील जि. प. शाळेच्या गोयेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या संमेलनात ‘आजच्या युगाची संजीवनी बुटी मानतो आम्ही ग्रामगीता’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

      डॉ. श्रावण बानासुरे यांनी ‘प्रचार महिमा’ या उपविषयावर मार्गदर्शन करताना, राष्ट्रसंत हे केवळ संत किंवा कवी नव्हते तर ते आदर्श विचारांचे थोर मार्गदर्शक आणि परिवर्तनाची दृष्टी देणारे महान समाजसुधारक होते. त्यांच्या दृष्टीने प्रचार म्हणजे केवळ शब्दांचा गजर नव्हे तर जीवन जगण्याचे सूत्र होते. राष्ट्रसंतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटित प्रयत्न, लोकसहभाग आणि लोकाभिमुख भाषा आवश्यक असल्याचे मत मांडले.

     अँड. सारिका जेनेकर यांनी ‘महिलोन्नती’ या अध्यायावर बोलताना राष्ट्रसंतांची स्त्रीविषयक दृष्टी स्पष्ट केली. स्त्री ही केवळ कुटुंबाची आदर्श नसून समाज परिवर्तन करण्याची शक्ती तिच्यात असल्याने समाजात ती आपले स्थान निर्माण करू शकते. त्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी स्त्री शिक्षण व स्त्री स्वावलंबन यावरही प्रकाश टाकला.

           ‘प्रयत्न प्रभाव’ या अध्यायावर डॉ. धर्मा गावंडे यांनी राष्ट्रसंतांचे कर्मप्रधान तत्त्वज्ञान मांडले. प्रयत्नाशिवाय परिवर्तन घडत नाही आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करूनच प्रभाव निर्माण होतो, हा राष्ट्रसंतांचा संदेश आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

     ‘जीवन शिक्षण’ या विषयावर प्रा. नामदेव मोरे यांनी राष्ट्रसंतांचे संपूर्ण साहित्य म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र असल्याचे सांगितले. श्रम, सेवा, स्वच्छता, सदाचार आणि राष्ट्रनिष्ठा यांतून घडणारे शिक्षण खरे जीवन शिक्षण असल्याचे त्यांनी राष्ट्रसंतांचे विविध अभंग, ओव्या व भजनांचा उल्लेख करून स्पष्ट केले.

     परिसंवादाचे सूत्रसंचालन सुभाष पावडे तर आभारप्रदर्शन सुखदेव चौथाले यांनी केले. रात्रोच्या प्रबोधन संध्या कार्यक्रमात डॉ. उदार महाराज बेला (आदिलाबाद) यांचे तेलगू व मराठी बोली भाषेत ग्रामगीतेवर आधारित प्रभावी कीर्तन झाले. तर चेतन ठाकरे (आरमोरी) यांचे भारूड, अनुराग मुळे यांचे एकपात्री प्रयोग, मारोती साव यांचे व्यसनमुक्तीपर आत्मकथनाने सर्वांना रिझवले‌. देवराव कोंडेकर, विलास चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये