ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाच दिवसांपासून पोंभूर्णा शहर तहानलेले ; पाणीपुरवठा सभापती साखर झोपेत 

गणेश वासलवार नगरसेवक पोंभुर्णा यांचा खडा संवाल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा : शहरात गेल्या पाच दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये खासगी पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे नगरसेवक गणेश वासलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नगरपंचायत प्रशासनावर टीका केली आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांचा संयम संपत चालल्याचे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी पाणीपुरवठा सभापती केरळ दौऱ्यावर असताना शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप केला. शहर गंभीर पाणीटंचाईचा सामना करत असताना जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्या दुर्लक्षित केल्या जात असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरपंचायत प्रशासनाने तातडीने नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच रविवारीही शहरात पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर नगरपंचायत समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे , इशारा गणेश वासलवार यांनी दिला. या आंदोलनात महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगत, निर्माण होणाऱ्या परिस्थितीस नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित पदाधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये