ताज्या घडामोडी

बारा वर्षीय बालिकेसह चौघांचा अपघाती मृत्यू – भीषण अपघातात चार ठार चार गंभीर

कार नाल्यात कोसळली - राजुरा तालुक्यातील घटना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

कागजनगर येथिल कुटुंब नागपूरवरून परतीच्या प्रवासात असताना सोंडो सिद्धेश्वर दरम्यान काळाने अचानक घातलेल्या झडपेत बारा वर्षीय बालिकेसह चौघांचा जागीच मृत्यु झाला तर इतर चार प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित सर्व जखमींना नागपूर येथे हलविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, तेलंगणा राज्यातील कागजनगर येथिल 8 लोक नागपुर येथिल नातेवाईक यास्मीन बानो ह्यांना भेटण्याकरिता तसेच देवदर्शनाकरिता TS 02 EN 5544 क्रमांकाच्या आर्टिका कार ने गेले होते. नागपूर येथिल काम आटोपून कागजनगर येथे परतीच्या प्रवासात असताना कार चालकाला राजुरा तालुक्यातील सोंडो सिद्धेश्वर दरम्यान रात्री 12:30 या 1:00 च्या दरम्यान डुलकी आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटुन कार पुलावरून थेट नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की कोसळलेल्या कारचा आवाज सोंडो गावात ऐकायला आला. घटनेची कल्पना येताच नागरिकांनी धाव घेऊन राजुरा पोलिसांना पाचारण केले व दरम्यान बचावकार्य सुरू केले मात्र उंचावरून थेट नाल्यात कोसळलेल्या कार मधुन जखमींना बाहेर काढणे अशक्य होऊन बसल्याने पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार ह्यांच्या पोलिस चमूने महामार्ग निर्माण कंपनीच्या सहकार्याने अक्षरशः कटरच्या सहाय्याने कारचा काही भाग कापुन जखमींना बाहेर काढले मात्र 12 वर्षीय अक्सा शबरीन शेख, तिची आई सलमा बेगम झांकीर हुसेन (46), नातेवाईक अफजल बेगम (55), सायरा बानो (45) ह्यांचा जागीच मृत्यु झाला तर शाहीन निशा (37), नजत बेगम (48), नुसरत बेगम वय (45), अब्दुल्ल अरहान हे गंभीर जखमी झाले असुन कार चालक 28 वर्षीय अब्दुल रहमान हा आश्चर्यकारकरित्या सुखरूप बचावला आहे.

राजुरा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असुन मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. ठाणेदार सुमित परतेकी ह्यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार पुढील तपास करीत असून जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ह्यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये