ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे विदर्भ विज्ञान उत्सव 2025 चे भव्य उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी विज्ञान प्रकल्पांनी वेधले सर्वांचे लक्ष

चांदा ब्लास्ट

आजच्या विज्ञान प्रधान युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता व नवोन्मेषी विचार रुजविण्याच्या उद्देशाने चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूर येथे विदर्भ विज्ञान उत्सव 2025 चे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. विज्ञान भारती, विदर्भ प्रांत मंडळ व चांदा पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या विज्ञान उत्सवाचे उद्घाटन जिल्हा पोलीस उपअधीक्षक मा. श्री. प्रमोद चौगुले, यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी मा. श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, संचालिका, चांदा पब्लिक स्कूल या होत्या. विशेष अतिथी म्हणून मा. श्री. तुषारजी व्ही. देवपुजारी, जिल्हा संघ संचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूर यांची उपस्थिती होती. डॉ. श्री. संजीवजी पाटणकर, श्री. सतिशजी घारे, याशिवाय विज्ञान भारती, विदर्भ प्रांत नागपूर येथील पदाधिकारी, शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व पारंपारिक दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने संपूर्ण परिसर भारावून गेले। त्यानंतर हिरवे रोप देवून सर्व मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी केले. या विज्ञान उत्सवात विद्यार्थ्यांकरिता वातावरण बदल, राष्ट्रीय संरक्षण आणि एकात्मिक आरोग्य यावर आधारित विज्ञान मॉडेल, विज्ञान पोस्टर, विज्ञान रांगोळी व विज्ञान नाटिका स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण बदल, जागतिक तापमान वाढ, स्वदेशी तंत्रज्ञान, नवसंशोधन, आत्मनिर्भर भारत, मानव व प्राणी आरोग्य, जागतिक आरोग्य व पर्यावरण संवर्धन या विषयांवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेली विज्ञान मॉडेल्स व प्रकल्प विशेष आकर्षण ठरले.

उद्घाटना प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रमोद चौगुले म्हणाले, “विज्ञान ही केवळ प्रयोगशाळेपुरती मर्यादित नसून ती समाज परिवर्तनाची प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी व पर्यावरण संरक्षणासाठी करावा.” अध्यक्षीय भाषणात मा. श्रीमती स्मिता जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत विज्ञान ही केवळ पुस्तकीबाब नसून समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी शक्ती असल्याचे प्रतिपादन केले.

सर्व स्पर्धांचे बक्षिस वितरण मा. मिलींद कांबळे, विद्याशाखा प्रमुख, जी.एम.सी., चंद्रपूर यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहूण्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची माहिती जाणून घेतली व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

हा विदर्भ विज्ञान उत्सव 2025 विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, सर्जनशीलता व सामाजीक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निलिमा पाऊनकर समवेत आशुतोष पांडे, अभिलेश धात्रक, अन्जनेय मिश्रा, रीम्शा ठाकूर, अरमान शेख या विद्यार्थ्यांनी तसेच आभार प्रदर्शन जास्मीन हकीम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता शिक्षिका जास्मिन हकिम, पर्यवेक्षक महेश गौरकार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये