घुग्घुस नगर परिषदेची लापरवाही उघड
प्रभाग क्रमांक ०३ मध्ये पाण्याची उधळपट्टी सुरू, जबाबदार मौन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ०३ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी सातत्याने वाहत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ना पाणीपुरवठा सभापतींचे लक्ष आहे, ना मुख्याधिकारी, नगराध्यक्ष किंवा संबंधित अभियंता याकडे कोणतेही गांभीर्याने लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सदर पाण्याची गळती ही एचपी गॅस कॉम्प्लेक्सच्या समोर आहे. हा मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीचा असून दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. याच मार्गावर नामांकित खासगी रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स व पॅथॉलॉजी लॅब्स आहेत. शिवाय हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत असताना, दुसरीकडे प्रभाग क्रमांक ०३ मध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. ही बाब नगर परिषदेच्या गंभीर निष्काळजीपणाचे व प्रशासनाच्या उदासीनतेचे ज्वलंत उदाहरण आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी डोळेझाक करत आहेत. रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याचे नुकसान होत असून घसरगुंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, समस्या सर्वांच्या डोळ्यांसमोर असताना नगर परिषदेचे जबाबदार अधिकारी नेमके कशाची वाट पाहत आहेत? एखादी मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेकडे तात्काळ पाण्याची गळती दुरुस्त करून पाण्याची उधळपट्टी थांबवावी, तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देत आहेत.



