संपूर्णत: अभियानामध्ये देशात कारंजा तालुक्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : संपूर्ण देशभरामध्ये नीती आयोगाने संपूर्णत: अभियानात पाचशे तालुक्याची निवड केली. त्यातील अभियान 1.0 मध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कारंजा तालुका प्रशासनाने काम केले. त्यामुळेच तालुक्याने देशात 27 वा आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविला. आता संपूर्णत: अभियान 2.0 मध्ये देशात कारंजा तालुक्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
कारंजा (घा.) येथे संपूर्णत: अभियान 2.0 चे व आकांक्षा हाटचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आ.दादाराव केचे, आ.सुमित वानखेडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाठ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, गट विकास अधिकारी प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले, संपूर्णत: अभियानात सहा पैकी चार निकषांमध्ये कारंजा तालुक्याने शंभर टक्के लक्षांक साध्य केले आहे. निश्चितच टप्पा दोन मध्येसुद्धा प्रशासन अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात उमेद मध्ये व बचत गटांमध्ये सदस्य असलेल्या महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने 20 कोटी रुपयांचा उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदचे प्रॉडक्ट त्या ठिकाणी एकत्र करून त्याचे मार्केटिंग करणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आवश्यकतेनुसार लागणारे मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. जवळजवळ जिल्ह्यातल्या 200 जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणार आहे. येणाऱ्या काळात कारंजा तालुका समितीच्या ज्या शिफारशी असतील त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आमदार दादाराव केचे म्हणाले, अंत्योदयाचा विचार करून सरकारचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या योजना, आरोग्याच्या योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या अभियानातून गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले.
आमदार सुमित वानखेडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातले वाहून जाणारे पाणी पूर्व विदर्भात नेण्यात येणार आहे. आमचा प्रयत्न ते पाणी कारंजामध्ये आले पाहिजे, त्या पाण्यातून कारंजाची शेती फुलली पाहिजे, असा आहे. बचत गटांच्या मार्फत पॅकेजिंग आणि ब्रँडिंग केल्यास खूप चांगला फायदा महिलांना होऊ शकतो. संपूर्णत: अभियान 1.0 मध्ये कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी चांगले काम केले. निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पुढचा टप्पा अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडू असा विश्वास आ.वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केला.
सुरुवातीस पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूच्या आकांक्षा हाटचे फीत कापून उद्घाटन केले. यावेळी संपूर्णत: अभियान 1.0 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री डॉ.भोयर व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री.देशमुख यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने बचत गटांच्या महिला व नागरिक उपस्थित होते.



