विसापूर पॉवर हाऊसच्या जागेवर १०० बेडेड ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलिस बल केंद्र व महिला औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग मोकळा
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला सर्वसमावेशक विकासाचा प्रस्ताव

चांदा ब्लास्ट
मुख्यमंत्र्यानी दिले अप्पर मुख्य सचिव ऊर्जा यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चंद्रपूर :_
राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथील बंद पडलेल्या पॉवर हाऊसच्या सुमारे ३१.३५ हेक्टर शासकीय जमिनीचा लोकहितासाठी उपयोग करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर मांडला. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत सादर केलेल्या सविस्तर निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांना तात्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले.
विसापूर येथील ही जमीन अनेक वर्षांपासून वापराविना पडून असून, भौगोलिक स्थान आणि दळणवळणाच्या दृष्टीने ती सार्वजनिक उपक्रमांसाठी उपयुक्त असल्याचा मुद्दा निवेदनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला आहे. कामगारांच्या आरोग्यसुविधांसाठी १०० बेडेड ईएसआयसी (ESIC) अंतर्गत अत्याधुनिक रुग्णालयासाठी सुमारे ५ एकर जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर व आजूबाजूच्या कामगारांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.
कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य राखीव पोलिस बल (SRPF) केंद्राकरिता सुमारे ४५ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला. या ठिकाणी प्रशिक्षण सुविधा, निवास व्यवस्था, क्रीडांगण, हॉस्पिटल, शाळा आणि नक्षलविरोधी मोहीमेच्या दृष्टीने आवश्यक अधोसंरचना उभारणे शक्य होणार आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तिसऱ्या टप्प्यात महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासाठी १० एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उद्योगासाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन महिलांना स्वावलंबनाचा मजबूत आधार मिळेल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण प्रस्ताव गांभीर्याने ऐकून प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे विसापूर परिसराचा सर्वांगीण विकास, कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा, सुरक्षा यंत्रणेला बळकटी आणि महिलांसाठी नवे रोजगारक्षम क्षितिज निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल लोकनेते, विकासपुरुष आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कौतुक व्यक्त केले जात आहे.



