महिलांना ३१ मार्चपर्यंत ई-केवायशीत सुधारणा करण्याची संधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायशी करतांना चूकीचे पर्याय निवडण्यात आल्याचे अनेक महिलांचा लाभ बंद झाला होता. अशा महिलांना ई-केवायशी मध्ये सुधारणा करण्याची संधी दिनांक ३१ मार्चपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे ई-केवायशीच्या माध्यमातून दि.३१ डिसेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करण्यात आले. परंतू सदर प्रक्रिया पूर्ण करतांना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडतांना चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आले होते.
त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करुन लाभार्थ्यांच्या पात्रता, अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत शासनस्तरावरून जिल्हाधिकारी यांना दि.२० जानेवारी रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तथापि सदर लाभार्थ्यांची जलदगतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-केवायशी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्यानुषंगाने ऑनलाईन ई-केवायशी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
त्यानुसार ई-केवायशी करतांना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडतांना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे.
अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायशी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि.३१ मार्चपर्यंत पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.



