शासकीय औ. प्र. संस्थेत राष्ट्रीय गणित दिवस संपन्न
गणित विषयाच्या गुणवंताचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मशालेय गणित व शास्त्र तसेच अभियांत्रिकी चित्रकला विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस देशभर साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन ड्राॅईंग हालमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गजानन राजूरकर होते. प्रभारी गटनिदेशक तथा गणित चित्रकला निदेशक बंडोपंत बोढेकर , अजय मार्तिवार , सचिन महिंद्रकर, किशोर इरदंडे, शिल्पनिदेशिका सौ.सुमती गराड, कु.पाचे यांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक अजय मार्तिवार यांनी करून श्रीनिवास रामानुजन यांच्यावरील जीवनालेख प्रस्तुत केला. श्री. बंडोपंत बोढेकर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितीय प्रमेयावर भाष्य करून दैनंदिन मानवी जीवनातील गणिताचे महत्त्व विषद केले. याप्रसंगी प्राचार्य राजुरकर म्हणाले, अलिकडे गणित विषयाला महत्व येत असून गणित विषयाची अकारण भीती न बाळगता, सकारात्मक दृष्टिने या विषयाचा अभ्यास वाढविला पाहिजे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेतही गणितावर प्रश्न विचारले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमात गणित व अभियांत्रिकी चित्रकला विषयात पूर्ण गुण प्राप्त करणारे कु. मारिया उराडे, सलोनी बोडणे, नसिमा बानो हुसेन, राहुल शाह, हर्ष नक्कावार,साहिल भोयर, दिपक लेनगुरे यांना सन्मानित करण्यात आले तर उत्तम वर्गहजेरी पुरस्कार्थी म्हणून सोनाक्षी तेलंग,नेहा गुप्ता, सांची राऊत तसेच गणित विषयक उत्तम लेखन कौशल्य पुरस्कार्थी म्हणून आयुषी पिसे,सारिका लांडे, सोनल रंगारी यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन निदेशक किशोर इरदंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशक सचिन महिंद्रकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक अभय घटे, विलास खेडेकर, रमेश रणदिवे, भांडार विभागाचे श्री. रामटेके तसेच प्रशिक्षणार्थांनी सहकार्य केले.



