अखेर चोविस दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाची सांगता
वैयक्तीक व सामुहिक वनहक्क दाव्यांसाठी होते आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
जगन येलके यांच्या आंदोलनाला आले यश ; लेखी पत्र व कार्यवाही अहवाल दिल्यानंतर उपोषण व आंदोलन घेतले मागे
वैयक्तीक सात पट्टे व सामुहिक दाव्याची २० हेक्टर जमीनेचे पट्टे
पोंभूर्णा :- वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांच्या मंजुरीसाठी गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाची अखेर सांगता झाली आहे. वनहक्क प्रश्नांबाबत प्रशासनाकडून तातडीने केलेले ७ वैयक्तिक वनहक्क दावे व एक सामुहिक वनहक्क दाव्याचे आदेश व उर्वरित दावे एक महिन्याच्या कालावधीत पुर्ण करणार असल्याचे लेखी पत्र व कार्यवाही अहवाल देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्ते जगन येलके यांनी आपले चोविस दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण व आंदोलन मागे घेतले आहे.यावेळी भाजपा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष हरिष शर्मा यांनी जगन येलके यांना लिंबूपाणी पाजून अन्नत्याग उपोषण मागे घेण्यात आले.आंदोलनामुळे वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, प्रलंबित दाव्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
देवई,भटारी,केमारा या गावांना वनग्राम मधून काढून त्यांचे वनहक्के दावे तात्काळ मंजूर करून सामुहिक व वैयक्तिक पट्टे देण्यात यावे.या प्रमुख मागणीला घेऊन गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटनेचे संस्थापक जगन येलके यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर २४ दिवसांपासून अन्नत्याग उपोषणावर बसले होते.या दरम्यान विषयाच्या अनुषंगाने प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले मात्र आंदोलकांचे समाधान न झाल्याने आंदोलन २४ दिवसांपर्यंत सुरू राहिले.यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी दि.९ डिसेंबरला सुद्धा तीन तास रस्ता अडवून ठेवला होता.मात्र कोणतीही भुमिका प्रशासनाने न घेतल्याने संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी दि.१८ डिसेंबरला पुन्हा रस्ता रोको आंदोलन केले.दहा तास पुर्ण वाहतूक बंद होती.प्रशासनाने तातडीने मोहाडा (रै.) येथील सात वैयक्तिक वनहक्क दाव्यांचे पट्टे व चेक आष्टा गावाला सामुहिक वनहक्क दाव्यांसाठी कक्ष क्रमांक ९६ मधील २० हेक्टर जमीन देण्यात आली.यासोबतच केमारा,भटारी, देवई या गावातील ४२ दाव्यांपैकी १८ प्रकरणे उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे
लेखी पत्र व कार्यवाही अहवाल दिल्यानंतर उपोषण व आंदोलन घेतले मागे घेण्यात आले.व चोविस दिवसांपासून सुरू असलेले जगन येलके यांच्या अन्नत्याग उपोषणाची व आंदोलनाची सांगता झाली.या संघर्षामुळे वनहक्क दाव्यांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक संजय राईंचवार,भाजपा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष हरिष शर्मा,तहसीलदार मोहनिश शेलवटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले,सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार,ठाणेदार राजकमल वाघमारे,नायाब तहसीलदार रामकृष्ण उईके, दिपाली आत्राम,नगराध्यक्ष सुलभा पिपरे,पोलिस निरीक्षक सुमीत परतेकी,भाजपा तालुकाध्यक्ष हरिष ढवस,सामाजिक कार्यकर्ते गणेश परचाके, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे,गुरुदास पिपरे,बंडू बुरांडे,ईश्वर नैताम आदी उपस्थित होते.
चोवीस दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाची प्रशासन दखल घेत नाही.यामुळे उपोषणकर्ते आदिवासी नेते जगन येलके यांचे समर्थक व आदिवासी बांधवांनी गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून पोंभूर्णा-चिंतलधाबा मार्ग रोखून धरले होते.यामुळे वाहतूक दहा तास रोकल्या गेली होती.शाळेच्या बसेस तिथून जाऊ देण्यात आले होते.
यादरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होते.साधारण दोनशेहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणाचे देण्यात आले वनहक्क दाव्यांचे पट्टे –
पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा (रै.)येथील प्रभाकर कोवे, सुरेश कोवे,दिवाकर आत्राम,पत्रू घोडाम, नागेंद्र कोवे, एकनाथ कोवे,आनंदराव कोवे यांना वैयक्तिक वनहक्क दाव्यांचे पट्टे देण्यात आले आहे.तर चेक आष्टा गावाला वनविभागाच्या कक्ष क्रमांक ९६ मधील सामुहिक वनहक्क दाव्याचा २० हेक्टर जमीनाचा पट्टा देण्यात आला आहे.



