घोनाड येथे रासेयो शिबीराचे थाटात उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे ग्राम घोनाड ता. भद्रावती येथे थाटात उद्घाटन करण्यात आले. ‘स्वयंपूर्ण ग्राम विकासाकरिता युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित या उद्घाटनीय शिबिराचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. माधव कांडणगिरे यांनी शिबिराचे महत्त्व व भूमिका स्पष्ट करत रूपरेषा सर्वांसमोर मांडली.
शिबिराच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आसुटकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व त्याच्या प्रगतीसाठी कसे उपयोगाचे आहे ते सांगितले तर शिबिराचे उद्घाटन घोनाड येथील सार्वभौम ग्रामसभा अध्यक्ष पंढरीनाथ बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात शिबिरार्थींनी गावात येऊन राबविलेल्या उपक्रमाबाबत व श्रमदानाबाबत कौतुक करत. ग्राम विकासात तरूणांनी आपली उत्तम भूमिका बजावली पाहिजे असे म्हणत रासेयो हे उत्तम संस्काराचे केंद्र आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे घोनाड गावचे सरपंच महेंद्र भोयर यांनी ही शिबिरार्थींना यथायोग्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक गणेश दुधलकर व पांडुरंग पाटील मत्ते यांनी समयोचीत शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री रामदास पावडे, पल्लवी दैवलकर, पोलीस पाटील प्रवीण शेरकी, डॉ. गणेश सुरजूसे, सुरेश आस्वले व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. तरन्नुम शेख , प्रा. सवीता सुरस्कर, व शिबिरार्थ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मनीषा खणके यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मंगेश जमदाडे यांनी मान्यवरांचे आभार मानले.



