बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन
अनेक नामवंत संशोधकांचा सहभाग

चांदा ब्लास्ट
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली या संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव तसेच राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात एम. एस. रेड्डी यांनी बांबूला ‘ग्रीन गोल्ड’ असे संबोधून हवामान बदल, हरित विकास, रोजगारनिर्मिती तसेच शाश्वत अर्थव्यवस्था उभारणीमध्ये बांबूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. बांबू आधारित उद्योगांच्या वाढीसाठी शासन विभाग, संशोधन संस्था व उद्योग यांच्यातील समन्वय आणि सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. माधवी खोडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र बांबू औद्योगिक धोरण २०२५ चा संदर्भ देत बांबू हा उपजीविका निर्मिती, ग्रामीण विकास व हरित उद्योगांसाठी एक महत्त्वाचा स्रोत असल्याचे स्पष्ट केले. धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बीआरटीसीने संशोधन, नवोन्मेष, प्रोटोटायपिंग, कौशल्य विकास व व्यावसायिक प्रशिक्षण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने डॉ. खोडे यांनी नागपूर विद्यापीठ व बीआरटीसी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा उल्लेख करून शैक्षणिक सहकार्य, संयुक्त संशोधन, इंटर्नशिप तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमुळे बांबू तंत्रज्ञान व उद्योजकतेला चालना मिळेल, असे प्रतिपादन केले.
तांत्रिक सत्रांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील संशोधक व तज्ज्ञांनी बांबू हस्तकलेतील मूल्यवर्धन, आवश्यक तेलांपासून बांबू संरक्षकांची निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आधारित स्मार्ट बांबू लागवड, बांबू कोळशावर आधारित ऊर्जा निर्मिती, बांबू व इतर बांधकाम साहित्यांचे जीवनचक्र मूल्यांकन, बांबू प्रजातींचे औषधी गुणधर्म तसेच पर्यावरणपूरक बांबू संरक्षण तंत्रे अशा विविध विषयांवर संशोधन सादरीकरणे केली.
या परिसंवादास लालसिंग (वरिष्ठ शास्त्रज्ञ, नीरी–नागपूर), डॉ. प्रकाश इटनकर (नागपूर विद्यापीठ), डॉ. के. टी. व्ही. रेड्डी (डीन, दत्ता मेघे वैद्यकीय संस्था), डॉ. ए. एन. गुप्ता (जेडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर), दिनेश लाकडे (स्ट्रक्चरल तज्ज्ञ, वर्धा), प्रा. प्रमोद महाले (डीएमआयएचईआर विद्यापीठ), एमगिरी वर्धा चे दीप वर्मा, डॉ. प्रशांत तायडे, डॉ. संदीप जोशी, डॉ. विजय इलोरकर, आर्किटेक्ट आशिष नागपूरकर (व्हीएनआयटी, नागपूर), निधी गांधी (फॅशन डिझायनर), डॉ. मोनिकुंतला दास (आयआयटी, गुवाहाटी) तसेच डॉ. तारिका दगडकर (एसएमएमसीए, नागपूर) यांच्यासह अनेक मान्यवर तज्ज्ञ व संशोधक उपस्थित होते.
बीआरटीसीचे संचालक मनोजकुमार खैरनार यांनी प्रास्ताविकातून, बीआरटीसी केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या संशोधन उपक्रमांची, प्रशिक्षण कार्यक्रमांची, औद्योगिक सहकार्याची तसेच बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या दृष्टिकोनाची सविस्तर माहिती सादर केली. संचालन स्नेहा मांडकेर यांनी केले तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार यांनी मानले.



