चांदा पब्लिक स्कूल येथे ‘स्पोर्टस् फिएस्टा २के२५’ चे आयोजन

चांदा ब्लास्ट
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी चांदा पब्लिक स्कूल येथे दिनांक १६/१२/२०२५ ला ‘स्पोर्टस् फिएस्टा २के२५’ चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अविनाश पुंड जिल्हा क्रिडा अधिकारी, चंद्रपूर, श्री. संदीप उईके, तालुका क्रिडा अधिकारी, बल्लारपूर, विजय धोबाडे, एन.आय.एस. बॉक्सिंग कोच, चंद्रपूर, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण व खेळाडू मशाल पेटवून करण्यात आली.
दिनांक १६/१२/२०२५ ते १८/१२/२०२५ या तीन दिवसीय खेळाकरीता शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. त्यानंतर विविध खेळाचे प्रात्यक्षिक दाखविणारे नृत्य व ‘रस्सीखेच – टग ऑफ वॉर’ याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक खेळात भाग घेण्यास प्रवृत्त करीत शुभेच्छा दिल्या व विजय किंवा पराजय यापेक्षा खेळाडूवृत्ती, प्रामाणिक प्रयत्न व सहभाग महत्त्वाचा आहे, असा संदेश दिला.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व सांगतांना खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सकारात्मक दृष्टिकोण निर्माण होतो. शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा विकासही तितकाच आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यास प्रेरित केले.
उद्घाटनाला उपस्थित मान्यवरांनी क्रीडांचे शैक्षणिक व सामाजिक जीवनातील अनन्यसाधारण महत्व विषद करित आजच्या स्पर्धेच्या युगात मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने क्रिडेत प्रगती करीत आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे चांदा पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी सखी पांडूरंग दोरखंडे हिची यावर्षी ४ डिसेंबर २०२५ ला चीन मध्ये झालेल्या अंडर १५ वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियन शिपसाठी टीम इंडिया मध्ये झालेली निवड आहे आणि हे यश केवळ शाळेचेच नाही तर संपूर्ण देशाचे आहे, असे संबोधून क्रिडाक्षेत्रात उज्वल कारकीर्द घडविण्याच्या संधी चांदा पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असून त्याचा योग्य उपयोग करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला व शाळेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
‘स्पोर्टस् फिएस्टा’ मध्ये विद्यार्थ्यांसाठी रिंग पासिंग, सॅक रेस, टग ऑफ वार, चेन गेम, खो-खो, स्लो सायकलिंग, आट्या-पाट्या, लंगडी, फुटबॉल, कबड्डी इ. खेळांचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका निलीमा पाऊनकर, झोया शेख, पीहू शुक्ला ह्या विद्यार्थिनीने तर आभार प्रदर्शन अनन्या अलोणे या विद्यार्थिनीने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख महेश गौरकार, क्रिडा शिक्षक विनोद निखाडे, अमर कडपेवाले, रमेश कोडारी, जयंती मड्डेला, प्रणोती चौधरी व इतरांचे सहकार्य लाभले.



