ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा लोकसभेत बुलंद आवाज

शेतकरी, कामगार, रेल्वे आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी मांडला १० कलमी अजेंडा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न केवळ सभागृहातच मांडले नाहीत, तर थेट केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अतिवृष्टीबाधित चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ९३.७६ कोटी रुपयांची थेट मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी, कष्टकरी, रेल्वे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी घेतलेल्या या ‘लोकहितकारी’ भूमिकेमुळे हे अधिवेशन खऱ्या अर्थाने त्यांनी गाजवले आहे.

शेतकरी आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा उचलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कापूस उत्पादकांसाठी सीसीआयची खरेदी मर्यादा प्रति एकर ४० क्विंटल करण्याची मागणी केली. तसेच, देशात जातीनिहाय जनगणना व्हावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून २७ टक्के आरक्षण कायम ठेवावे आणि क्रिमीलेअरची मर्यादा वाढवावी, असे मुद्दे त्यांनी लावून धरले. यासोबतच, वेकोलि बाधित शेतकऱ्यांना ‘कोल बेअरिंग ॲक्ट’नुसार वाढीव मोबदला आणि सन २००० पूर्वीच्या शिक्षकांना ‘टीईटी’ परीक्षेतून सवलत देण्याबाबत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. बँकिंग क्षेत्रातील शैक्षणिक कर्जाचा एनपीए ७ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांच्या प्रश्नामुळे समोर आली आहे.

आरोग्य आणि कर्मचारी हितासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीत महत्त्वाची पावले उचलली. ‘उमेद’ अभियानातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन या विभागाला स्वतंत्र दर्जा देण्याची मागणी केली. तसेच, लोकसभेत महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारला या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येकडे लक्ष देण्यास भाग पाडले. बिगर धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये हा आजार वाढणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी संसदेत आकडेवारीसह पटवून दिले.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जिल्ह्यासाठी मागण्यांचे ‘गाठोडे’ सादर केले. यामध्ये तिसरी व चौथी रेल्वे लाईन पूर्ण करण्यासाठी भूसंपादन निधी, राजधानी व दुरांतो सारख्या गाड्यांना थांबा, मुंबई-पुणे प्रतिदिन रेल्वे आणि चंद्रपूरला केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्र रेल्वे झोनची निर्मिती यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावांचा समावेश आहे. एकूणच, संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणे आणि मंत्र्यांसोबतच्या बैठकांमुळे त्यांनी मतदारसंघाचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवला असून, सर्व प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये