भाजप कार्यालय विचारांचे, संघटनाचे आणि जनसेवेचे केंद्र बनेल – आ. किशोर जोरगेवार
गांधी चौक येथे भाजप कार्यालय सुरू

चांदा ब्लास्ट
आजवर आपल्या पक्षाचे चंद्रपूर शहरात स्वतंत्र, सुसज्ज असे कार्यालय नव्हते. मात्र आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. या कार्यालयामध्ये बैठकांसाठी स्वतंत्र मीटिंग रूम, कार्यकर्त्यांसाठी सभा हॉल असून, हे कार्यालय केवळ इमारत न राहता पुढील काळात विचारांचे, संघटनाचे आणि जनसेवेचे केंद्र बनेल, असा पूर्ण विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर चे कार्यालय सुरू करण्यात आले. सुरू झालेल्या नव्या कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, माजी महापौर राखी कंचरलावार, रघुवीर अहिर, भाजप नेते प्रकाश देवतळे, दशरथसिंग ठाकूर, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, श्याम कणकम, नामदेव डाहुले आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो राष्ट्रसेवेचा विचार, संस्कार आणि शिस्त यांचा संगम आहे. या कार्यालयातून कार्यकर्त्यांना दिशा मिळेल, सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकले जातील आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल.
माझा वाढदिवस साजरा करताना फक्त शुभेच्छा न देता, समाजोपयोगी उपक्रम, पक्ष संघटन बळकट करणारे कार्य करून मला आपण सन्मान दिला आहे, त्याबद्दल मी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा मनःपूर्वक आभारी आहे.
या कार्यालयाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या विकासासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी माझा लढा अधिक ताकदीने सुरू राहील. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अपेक्षेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथून होणार. आज उद्घाटन झालेलं हे कार्यालय संघटनाची शक्ती, विचारांची स्पष्टता आणि जनतेशी नातं दृढ करणारे केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पक्षात आलेल्या सर्व नवीन सदस्यांची पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



