पिपरी (धानोरा) येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे भक्तिमय वातावरणात आयोजन
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश दादापाटील चोखारे यांची उपस्थित

चांदा ब्लास्ट
पिपरी (धानोरा) :_ येथे पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या श्रीमद् भागवत सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात ह. भ. प. प्रभुजी वरडोळे महाराज यांच्या अमृतमयी वाणीतून भागवत कथा, कीर्तन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून, गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत सप्ताहाचे कार्यक्रम नियमितपणे सुरू आहेत.
भागवत सप्ताहाच्या माध्यमातून धर्मसंस्कार, समाजप्रबोधन आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार होत असून, या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी भागवत कथा, हरिनाम जप, कीर्तन तसेच प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताह काळात गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, परिसरात धार्मिक उत्साह पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भागवत सप्ताह समिती सक्रियपणे कार्यरत असून, समितीचे अध्यक्ष कैलास पानघाटे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष गोसाई तुराणकर, बबन मोहितकर, मारोती पिंपळकर,जनार्दन चिडे,बापूराव येरगुडे अध्यक्ष मंदिर समिती ,गणेश आवारी, रंगराव पवार, अतुल मोहितकर, अभय तुराणकर, दीपक अडवाले, शामसुंदर मूठ्रठलकर तसेच गावातील सर्व युवकांनी व माजी अध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच पिपरी (धानोरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई माथने व समस्त ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्था पिपरी आणि गावातील सर्व भजन मंडळे ,व सर्व माजी अध्यक्ष सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
दरम्यान, या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश दादापाटील चोखारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थितांनी भागवत सप्ताहास शुभेच्छा देत धार्मिक कार्यक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, असे मत व्यक्त केले.
भागवत सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, संस्कृती जपणूक आणि नव्या पिढीमध्ये धार्मिक मूल्यांची रुजवण होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भागवत कथांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भागवत सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



